Wednesday, August 19, 2026
Homeक्राईमNashik News : बॅनरने हिरावला 'रोहित'चा श्वास; विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Nashik News : बॅनरने हिरावला ‘रोहित’चा श्वास; विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जागतिक आदिवासी दिनाचा (World Tribal Day) उत्साह, मित्रांसोबत कार्यक्रमाची चाललेली तयारी आणि उत्सवाचे बॅनर लावण्याची लगबग… मात्र या सर्व आनंदावर क्षणार्धात काळाने घाला घातला! दुगाव फाटा येथे आदिवासी दिनानिमित्त बॅनर लावत असताना विजेचा भीषण धक्का (Electric Shock) लागून २२ वर्षीय रोहित विष्णू गायकवाड या तरुणाचा मृत्यू (Death) झाला. जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येलाच घडलेल्या या घटनेमुळे दुगाव परिसरासह गिरणारे भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ६) सायंकाळच्या सुमारास रोहित गायकवाड हा मित्रांसोबत दुगाव फाटा परिसरातील (Dugaon Phata Area) पानटपरी स्टॉपजवळ आदिवासी दिनाचे बॅनर लावण्याचे काम करत होता. बॅनरचे समायोजन करताना किंवा जुना फलक बाजूला करताना अचानक वरून गेलेल्या उच्चदाबाच्या किंवा उघड्या वीजवाहिनीचा (लाइव्ह वायर) झटका रोहितच्या हाताला बसला. तर त्याच्यासोबत असलेले दोन मित्र विजेच्या धक्क्याने दूर फेकले गेले. सुदैवाने ते दोघ बचावले.

घटनेची माहिती मिळताच रोहितच्या वडिलांनी (Father) आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला गिरणारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik Civil Hospital) हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रोहितला मृत घोषित केले. या घटनेची नोंद नाशिक तालुका पोलीस ठाण्यात (Nashik Taluka Police Station) करण्यात आली आहे.

उघड्या वायर्सचा जीवघेणा सापळा

सण-उत्सव किंवा जयंतीनिमित्त तरुण वर्ग उत्साहाने रस्त्यांवर आणि उंचावर जाऊन फ्लेक्स/ बॅनर लावतात. मात्र, अशा वेळी आसपास विजेच्या तारा आहेत का, याची साधी दक्षताही घेतली जात नाही. सार्वजनिक ठिकाणी किंवा टपऱ्यांवर उघड्या लटकणाऱ्या वीजवाहिन्यांकडे महावितरणचे होणारे दुर्लक्ष निष्पाप जीवांच्या जीवावर उठत असल्याचा रोष ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

हॉकी वर्ल्डकप २०२६ : भारताचा पाकिस्तानवर 5-3 फरकाने दणदणीत विजय

0
नेदरलॅंड येथील अॅमस्टेलव्हीन येथील वाजेनर मैदानावर खेळल्या गेलेल्या हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 असा दणदणीत विजय मिळवत दुसऱ्या फेरीतील आपले स्थान...