नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरातील खड्ड्यांच्या (Nashik City Potholes) प्रश्नावरून शनिवारी आयोजित विशेष महासभा (Mahasabha) सुरू होताच सभागृहात जोरदार आंदोलन करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा ठाकरे आणि ज्योती गांगुर्डे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले.
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला असून अनेक नागरिक जखमी (Injured) झाले आहेत. त्यामुळे केवळ खड्डे बुजविण्याची कारवाई न करता नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी, ठेकेदार आणि संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी (Protest) केली.
‘नाशिक शहराला (Nashik City) खड्ड्यात घालणाऱ्यांवर कारवाई करा’, ‘निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?’ असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. रस्त्यांची निकृष्ट कामे, वारंवार उखडणारे पॅचवर्क आणि नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेल्या खेळाला जबाबदार कोण, याचा जाब प्रशासनाने द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनामुळे विशेष महासभेच्या सुरुवातीलाच वातावरण तापले. घोषणाबाजी आणि गोंधळ वाढत असताना महापौर हिमगौरी आडके आहेर (Mayor Himgauri Adke) यांनी हस्तक्षेप करत सर्व आंदोलकांना शांत केले आणि जागेवर बसविले. त्यानंतर सभेचे कामकाज पुढे सुरू झाले.
दरम्यान, खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता विशेष महासभेचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आजची महासभा केवळ खड्डे बुजविण्याच्या आश्वासनापुरती मर्यादित राहणार की प्रत्यक्ष जबाबदारी निश्चित करून कारवाईचा निर्णय घेतला जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.




