नाशिक | Nashik
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी (Nashik NMC Election) महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या एकूण १२२ सदस्यांची त्यात २९ चार व दोन तीन सदस्य प्रभाग रचनेला (Ward Structure) अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच आरक्षण सोडत काढून पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.
अंतिम रचना जाहीर झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाकडून त्वरित महिला ओबीसींसह (OBC) इतर आरक्षणांची (Reservation) सोडत काढली जाणार आहे. यासाठी मुंबईनाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात नियोजन करण्यात येणार असल्याचे बोलले जाते. तसेच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बोलावून चिठ्ठ्या काढल्या जाणार असल्याचे समजते. ११ जूनपासून नाशिक महापालिका प्रशासन प्रभाग रचना तयार करण्याचे काम करत होते.
दरम्यान, नाशिक मनपाने प्रत्यक्ष मतदानासाठी (Voting) ४००० ईव्हीएमची मागणी केली आहे. सुमारे १८०० मतदान केंद्रांवर या यंत्रांचा वापर होईल. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व वेगवान पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर काटेकोर व्यवस्थापन करण्यात येत आहे. मतदान प्रकियेसाठी ९,५०० पेक्षा जास्त कर्मचारी लागणार आहेत. यामध्ये शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, महापालिकेच्या शाळांतील शिक्षक तसेच मान्यताप्राप्त खासगी शाळांतील शिक्षकांची मदत मनपा घेणार आहे.
दिवाळीनंतर निवडणूक?
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर दिवाळीनंतर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वपक्षीय नेते, माजी नगरसेवक व इच्छुक प्रभागात अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. त्याचप्रमाणे महायुती व महाविकास आघाडी होणार का, याकडेदेखील लक्ष लागले आहे.




