नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कर महापालिकेच्या विभागाकडून (Tax Department) राबविण्यात आलेल्या अभय योजना अंतर्गत सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२५ या दोन महिन्यांत (Month) तब्बल ५६ कोटी ५४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या काळात करदात्यांना १५ कोटी ३९ लाख रुपयांची सवलत देण्यात आली असून, ५३ हजार २७० करदात्यांनी या काळात योजनेचा लाभ घेतला.
दरम्यान मनपाने कर थकबाकीदारांसाठी सुरू केलेल्या ‘अभय योजना’ला एक महिन्याची मुदतवाढ (Extends) देण्यात आली असून आता पूर्ण नोव्हेंबर महिना ९५% तर डिसेंबरमध्ये ८५% शास्ती माफी होणार आहे. सप्टेंबरपासून सुरू झालेल्या विशेष वसुलीमध्ये सर्वाधिक कामगिरी पंचवटी विभागाने केली आहे.
पंचवटी विभागाने एकूण १३,२६८ प्रकरणे निकाली काढून १२ कोटींपेक्षा जास्त वसुली केली आहे. यानंतर नवीन नाशिक आणि नाशिक पूर्व विभागांनी अनुक्रमे ११,२४४व ९,४६४ प्रकरणे निकाली काढत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. सातपूर, नाशिकरोड आणि नाशिक पश्चिम विभागांनीही लक्षवेधी वसुली केली असून सर्व विभागांनी मिळून मनपाच्या महसुलात वाढ केली आहे.
डिसेंबरमध्ये ८५टक्के शास्तीमाफी
मनपाच्या कर आकारणी विभागाकडून थकबाकीदार करदात्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अभय योजना अंतर्गत शास्ती व इतर फीमध्ये सवलत देण्याच्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. करदात्यांना एक रकमी भरणा केल्यास शास्तीमाफीचा लाभमिळत आहे. नवीन वेळापत्रकानुसार, दि. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान भरणा करणाऱ्या करदात्यांना ९५ टक्के सवलत, तर १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत भरणा करणाऱ्यांना ८५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. या योजनेच्या कालावधीपूर्वी अथवा समाप्तीनंतर भरणा केल्यास सवलतीचा लाभमिळणार नाही, तसेच परताव्यासाठी दावा करता येणार नाही, असे मनपाने स्पष्ट केले आहे.
सुट्टीच्या दिवशीही काम
मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्याती सोय देखील मनपाने करुन दिली आहे. तर १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मनपाच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये व नागरी सुविधा केंद्रांमध्ये वसुली केंद्रे सुरू राहणार आहेत. मनपाने थकबाकीदारांना दिलेली संधी अंतिम संधी मानून तत्काळ कर भरावे. निर्धारित कालावधीनंतर अधिनियमानुसार जप्तीची कारवाई करण्यात येईल.
अजित निकत, उपायुक्त, कर, मनपा





