Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik NMC Politics : स्थायी सभापती पदासाठी नवा पेच; राष्ट्रवादीनेही ठोकला दावा,...

Nashik NMC Politics : स्थायी सभापती पदासाठी नवा पेच; राष्ट्रवादीनेही ठोकला दावा, भाजपसमोर आव्हान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदासाठी (Standing Committee Chairman) ऐनवेळी महायुतीतील राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजपकडून मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांनी आज अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्याविरूद्ध राष्ट्रवादीचे मुकेश शहाणे यांनी देखील उमेदवारी दाखल केल्याने वरिष्ठ काय निर्णय घेता याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

महापौरपद भाजपकडे (BJP Mayor) आणि उपमहापौरपद शिवसेना शिंदे गटाकडे गेल्यानंतर राष्ट्रवादीकडून स्थायी समिती सभापती पदावर दावा करण्यात येत आहे. महायुतीत सर्व घटकांना सत्तेत समान सहभाग मिळावा, अशी भूमिका पुढे करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सभापतीपदाला महापालिकेची ‌‘अर्थवाहिनी‌’ मानले जाते. आर्थिक निर्णय, विकास कामांना मंजूरी आणि महत्त्वाच्या प्रस्तावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्याचे अधिकार या समितीकडे असल्याने या पदासाठी राजकीय चढाओढ असते. आता माघारीपर्यंत महायुतीत तडजोड होते की सरळ सामना होतो, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

संख्याबळ भाजपकडे असले तरी राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे निर्माण झालेला पेच निवडणुकीत कोणते वळण घेतो हे बुधवारी स्पष्ट होणार आहे. १६ सदस्यांची निवड प्रक्रिया झाल्यानंतर सभापती निवडीचे बिगुल वाजले असून, आज (दि.२३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली. निवडणूक येत्या बुधवारी (दि.२५) होणार आहे. या पदासाठी भाजपमध्ये तिघांमध्ये चुरस असल्याचे चित्र होते. मात्र उप महापौरपदाच्या निवडणुकीतून पक्षाच्या आदेशानुसर माघार घेणाऱ्या पंचवटी येथील नगरसेवक सानप यांना भाजपने उमेदवारी दिली. १६ पैकी ९ सदस्य भाजपचे असल्याने त्यांची निवड एकतर्फी मानली जात आहे. तरी राष्ट्रवादीने उमेदवारी दाखल करुन डोकेदुखी वाढवली आहे.

दरम्यान, अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि राष्ट्रवादीच्या (NCP) गटात सामील झालेले शहाणे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केल्याने महायुतीतच नवा पेच निर्माण झाला आहे. स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी ९ सदस्य भाजपचे असल्याने ‌‘मॅजिक फिगर‌’ त्यांच्या बाजूने असल्याचे मानले जाते. शिवसेना शिंदे गट व मनसे आघाडीचे ४, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस आघाडीचे २, तर राष्ट्रवादी काँग्रेस-अपक्ष आघाडीचा १ सदस्य असे सध्याचे संख्याबळ आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडे स्पष्ट आघाडी असली तरी महायुतीतील (Mahayuti) सत्ता वाटपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

स्थायी सदस्य खालीलप्रमाणे आहे

भारतीय जनता पार्टीचे माधुरी बोलकर, नितीन निघळ, पल्लवी गणोरे, दिपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडे, अदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप तर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीचे मयुरी पवार, किरण गामणे (दराडे), राहुल दिवे, रंजना बोराडे तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आघाडीचे भारती ताजनपुरे, योगेश गाडेकर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच अपक्ष आघाडीकडून मुकेश शहाणे आहे.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...