Monday, November 9, 2026
HomeनाशिकNashik Onion News : शासकीय कांद्याची दिल्लीवारी; आज लासलगावहून ८४० टन कांदा...

Nashik Onion News : शासकीय कांद्याची दिल्लीवारी; आज लासलगावहून ८४० टन कांदा रवाना होणार

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव ६० ते ७० रुपये किलोवर पोहोचल्याने ग्राहकांना (Customer) दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. बफर स्टॉकमधून दिल्लीला (Delhi) ८४० टन कांदा पाठवण्यासाठी लासलगाव रेल्वे स्थानकात (Lasalgaon Railway Station ) २१ बोगींची मालगाडी दाखल झाली. मात्र, कांद्याची प्रतवारी व पॅकिंग वेळेवर न झाल्याने ही मालगाडी तब्बल १६ तास मालधक्क्यावरच रखडली होती. अखेर मंगळवारी सायंकाळी पॅकिंग झालेला कांदा आणल्यानंतर लोडिंग सुरू झाले.

- Advertisement -

ही मालगाडी आज (बुधवारी) दिल्लीकडे रवाना होणार आहे. दिल्लीपाठोपाठ कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई आणि कोचीन या प्रमुख महानगरांमध्येही लासलगाव, निफाड व मनमाड येथून रेल्वेने कांदा पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, निफाड (Niphad) येथून गुवाहाटीसाठी नियोजित असलेली मालगाडी रद्द करण्यात आली असून, या आठवड्यात इतर शहरांसाठी कांदा रवाना केला जाण्याची शक्यता आहे.

आंदोलनाचा इशारा

सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शासनाने हा कांदा देशांतर्गत बाजारात न आणता परदेशात निर्यात करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. देशांतर्गत बाजारात बफर स्टॉक आणून दर पाडण्याचा प्रयत्न झाल्यास ‘रस्ता रोको’ आणि ‘रेल रोको’ आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष केदार नवले, शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी व निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुराशे या शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

बाजारभावावर काय परिणाम?

लासलगावहून दिल्लीला पोहोचण्यासाठी मालगाडीला ४० ते ४८ तास लागणार आहेत. दिल्लीत पोहोचल्यानंतर हा कांदा कोणत्या दराने विक्रीसाठी उपलब्ध केला जातो, यावर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील भविष्यातील कांद्याचे भाव अवलंबून असतील. त्यामुळे केंद्राची ही ‘दिल्लीवारी’ ग्राहकांना दिलासा देणारी तरली तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे.

ताज्या बातम्या

Rahata : कोल्हारमध्ये भर बाजारपेठेत गोडाऊनला आग

0
कोल्हार |वार्ताहर| Kolhar एकीकडे दीपावलीच्या सणाच्या धामधुमीत सर्वजण असताना कोल्हार बुद्रुक येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ भर मार्केटमध्ये मध्यवर्ती ठिकाणी सोमवारी रात्री सात वाजेच्या सुमारास अचानक एका...