ओझर | वार्ताहर Ozar
ओझर नगरपरिषद स्थापनेनंतर प्रथमच होणार्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी शहर व उपनगरातील एकुण तेरा प्रभागातील आरक्षण येथील पगार गवळी मंगल कार्यालयात दिंडोरी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, ओझर नगरपरिषद मुख्याधिकारी किरण देशमुख, तलाठी सागर शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांकडून आरक्षण सोडत काढण्यात आले.
नगराध्यक्षाचे आरक्षण अनु जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्यानंतर प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढल्यानंतर ‘कही खुशी कही गम’ चा माहौल असतांना अनेक प्रभागात महिलांच्या नावे आरक्षण निघाल्याने नगराध्यक्षासह आगामी काळात ओझर नगरपरिषदेवर महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले. ओझर नगरपरिषदेच्या एकुण तेरा प्रभागातील सत्तावीस जागांसाठी येथील पगार गवळी मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात आली.
ओझर नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. पन्नास टक्के महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओझर नगरपरिषदेच्या १४ जागा या महिलांसाठी राखीव असुन आरक्षण सोडतीत अनु.जातीच्या तीन, अनु जमातीच्या दोन, इतर मागासवर्गीय चार तर सर्वसाधारण गटाच्या महिला पाच महिला या ओझर नगरपरिषदेचा निवडणुकीनंतर कारभार हाकणार आहेत. आरक्षण सोडतीनंतर विविध प्रभागातील इच्छुक पुरुषांचा मोठा हिरमोड झाल्याचे दिसुन आले तर अनेकांनी आता आपल्या सौभाग्यवतीला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.
पहिल्याच निवडणुकीत आपल्या भाळी नगरसेवकाचा टिळा लावण्यासाठी इच्छुकांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण ढवळुन निघणार असुन आगामी काळात ओझरच्या बाणगंगा नदीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहुन जाणार आहे. नगराध्यक्षपद अनु जाती साठी राखीव झाल्यानंतर इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण गटातील भावी नगराध्यक्षपदाचे डोहाळे लागलेल्यांना आपल्या इच्छेला मुरड घालत आता ‘दुधाची तहान ताकावर’ भागवावी लागून उपनगराध्यक्षपदाची माळ गळ्यात घ्यावी लागणार आहे.
याप्रसंगी ओमको चेअरमन राजेंद्र शिंदे, माजी सरपंच संजय कुर्हाडे, हेमंत जाधव, प्रदिप अहिरे, संजय पगार, बापु चौधरी, नितीन जाधव, युवराज शेळके, ओमको संचालक रऊफ पटेल, संजय सोनवणे, प्रशांत पगार, श्रीकांत अक्कर, कामेश शिंदे, भारत पगार, कैलास शिंदे, नितीन काळे, महेश शेजवळ, दिलीप कदम, राकेश जाधव, नंदकुमार कदम, बापु जाधव, रत्नाकर कदम, विपीन जाधव आदी विविध पक्षांचे कार्यकर्ते नगरपरिषद अधिकारी व सेवक उपस्थित होते.
असे आहेत प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १ अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला,
प्रभाग २ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण,
प्रभाग ३ अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण,
प्रभाग ४ अनुसूचित जाती महिला नागरिकांच्या मागास प्रवर्ग,
प्रभाग ५ अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला,
प्रभाग ६ अनुसूचित जमाती महिला सर्वसाधारण,
प्रभाग ७ नागरिकांचा मागास प्रवर्ग.
प्रभाग ८ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण,
प्रभाग ९ अनुसूचित जमाती सर्वसाधारण महिला,
प्रभाग १० नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला,
प्रभाग ११ अनुसूचित जमाती महिला सर्वसाधारण,
प्रभाग १२ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण,
प्रभाग १३ अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण.





