नाशिक | प्रतिनिधी
नाशिकचा गणेशोत्सव यंदा दणक्यात साजरा होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाच्या डीजेबंदी धोरणाला पालकमंत्री दादा भुसे यांनी ‘साई़डट्रॅक’ करुन गणेशमंडळांना डीजेचा दणदणाट करण्यास परवानगी दिली आहे.
पण त्यासाठी मंडळांना संहितेचे पालन करण्याच्या सूचनाही (दि. ३०) शुक्रवारी दिल्या. गणेश मंडळांना आवाजाची मर्यादा आणि वेळेचे बंधन पाळावे लागणार आहे. याशिवाय मिरवणूक शेवटचा गणपती विसर्जित होईपर्यंत सुरू राहू शकते आणि अखेरचे पाच दिवस १२ वाजेपर्यंत वाद्य वाजवण्याचीही परवानगी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ‘प्रखर’ लेझर लाईटच्या लखलखाटावर बंदी कायम ठेवली आहे.
हे ही वाचा : चोरट्याची हिंमत तर पहा… भरदिवसा घरात घुसून महिलेला लुटले!
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत सन २०२३ पारितोषिक वितरण व सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ शांतता समितीची बैठक शुक्रवारी (दि.३०) जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त जलज शर्मा, गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, राष्ट्रवादी शरदपवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदिंसह विविध विभागांचे अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ मेट्रोचे अध्यक्ष अजय महाजन, खजिनदार दीपक धारराव, संस्थापक अध्यक्ष हंसराज देशमुख यांच्यातर्फे गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरीत केले. तर गणेश मंडळांना जाहिरात शुल्क न आकरण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेण्याबाबत सुचित केले. गणेश मंडळांना घरघुती दराने वीज उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करु असेही भुसे यांनी सांगितले.
हे ही वाचा : “अजित पवारांशी युती म्हणजे असंगाशी संग”; भाजप नेत्याच्या विधानामुळे महायुतीत वादाच्या ठिणग्या?
भुसे म्हणाले…
कायदा व सुव्यवस्थेला बाधा न येता सर्वांच्या समन्वयातून व सहकार्याने आगामी गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करुया, नाशिक जिल्ह्याला सण, उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. हा नावलौकीक कायम राखण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करु. गणेशोत्सव मंडळांना कुठलीही अडचण येवू नये तसेच त्यांच्या अडचणीचे तातडीने निवारण होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात पोलीस, महापालिका व वीज वितरण कंपनीचे प्रतिनिधी यांचे एक पथक नेमण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचबरोबर गणेशोत्सावाच्या काळात शहरात स्वच्छता राखली जाईल, तसेच वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविणे, या मार्गावरील अतिक्रमण काढणे, मिरवणुकीस अडथळा येणाऱ्या विद्युत तारा हटविणे, नागरीकांसाठी रस्ते मोकळे राहतील याबाबत दक्षता घेण्याच्या सुचनाही केल्या.
हे ही वाचा : महाविद्यालयात जाताना काढली विद्यार्थीनीची छेड
आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या सुचना
मंडळांनी आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे
गणेश मंडळांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील
एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व परवानगी तातडीने
विविध ठिकाणी बंदोबस्तासह संवेदनशिल ठिकाणी सशस्त्र पोलीस तैनात
सर्वांनी परवानगीतील नमूद अटी, शर्तींचे पालन करावे
नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई प्रस्तावित
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा