Saturday, October 19, 2024
Homeक्राईमतडीपारीचा धाक संपुष्टात?; आठवड्याभरात घरात, मित्र-नातेवाईकांकडे सापडले 'इतके' सराईत

तडीपारीचा धाक संपुष्टात?; आठवड्याभरात घरात, मित्र-नातेवाईकांकडे सापडले ‘इतके’ सराईत

नाशिक | प्रतिनिधी
सराईतांकडून गंभीर गुन्हे घडण्यासह कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहाचू नये यासाठी करण्यात आलेल्या सराईतांवरील प्रतिबंधात्मक कारवाईचा डोस कमी पडतो आहे. कारण शहरातील सराईतांना जिल्ह्याबाहेर तडीपार करुनही ते घरी व नातलगांकडे व मित्र परिवाराकडे आढळून आले आहेत.

ऑगस्ट महिन्यात शहरातील जुने नाशिक परिसरात दोन गटात दंगल झाली होती. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करीत तसेच प्राणघातक हल्ले करीत दहशत माजवली, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील जमावाविरोधात गंभीर गुन्हे दाखल करून संशयितांची धरपकड केली आहे. तर अनेकांची ओळख पटवून त्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, गणेशोत्सव व ईद निमित्त शहरात शांतता रहावी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा, गंगापूर, महसरूळ, आडगाव व मुंबईनाका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १६७ तर इंदिरानगर, अंबड, सातपूर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १९४ गुन्हेगारांना भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ नुसार ७ ते १९ सप्टेंबर या कालावधीसाठी शहरातून तडीपार केले आहे. यात बहुतांश तडीपार हे ऑगस्ट महिन्यात झालेल्या दंगलीत सहभागी आहेत. तसेच इतर सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून दररोज स्थानिक व गुन्हे शाखेच्या पोलिसांमार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जात आहे. टवाळखोरांवरही कारवाई केली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, ७ ते १५ सप्टेंबर या कालावधीत पोलिसांनी केलेल्या नियमीत तपासणीत शहरातून तडीपार केलेल्यांपैकी १२५ गुन्हेगार हे शहरातच फिरताना आढळून आले. त्यामुळे त्यांना पकडून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी भद्रकालीच्या हद्दीत सर्वाधिक २०, पंचवटीतील १९, इंदिरानगरच्या हद्दीतील १६ व मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ तडीपार आढळून आले. यातील ११ तडीपार हे याआधीच शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले होते, मात्र तेदेखील शहरात विनापरवानगी फिरताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचीही धरपकड केली.

दंगलखोर रडारवर
गणेशोत्सव, ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शहरातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३६१ गुन्हेगारांना ७ ते १९ सप्टेंबर दरम्यान, शहरातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र ७ ते १५ सप्टेंबर दरम्यान, शहर पोलिसांनी शोधमोहिम राबवून तडीपार केलेल्यांपैकी १२५ गुन्हेगारांना शहरातूनच ताब्यात घेतले. त्यामुळे तडीपारीतील ३५ टक्के गुन्हेगार शहरातच अस्तित्व लपवून बसलेले आढळले आहेत, विशेष म्हणजे जुने नाशिकमध्ये उसळलेल्या दंगलीत सहभागी दोन्ही गटांतील संशयितांवरही निरंतर कारवाई सुरु आहे.

पकडलेले तडीपार
भद्रकाली २०
पंचवटी १९
इंदिरानगर १६
मुंबईनाका १४
अबड ११
नाशिकरोड १०
सातपूर ८
उपनगर ८
सरकारवाडा ५
आडगाव ५
गंगापूर ४
म्हसरुळ ३
देवळाली कॅम्प २

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या