नाशिक | प्रतिनिधी
आगामी सिंहस्थाकरिता कायदा-सुव्यवस्थेसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व नियोजनाकरिता पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र सिंहस्थ सेल स्थापन करण्यात आला आहे. आता हा सेल अपडेट करण्यात आला असून त्याचे ‘प्रभारी’ अधिकारी म्हणून गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यासंदर्भात आदेश जारी केले असून विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक युवराज पत्की व अंकुश चिंतामण यांचीही सिंहस्थ कक्षात अतिरिक्त नेमणूक झाली आहे.
सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तालयाने कामांना गती दिली आहे. यात कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, बंदोबस्ताची आखणी, वाहनतळे, वाहनांचे मार्ग ठरविण्यासह ‘व्हीआयपींचे दौरे, सीसीटीव्ही, गर्दी नियंत्रण आणि व्यवस्थापनासह इतर सर्व महत्त्वाच्या मुद्यांवरील कामकाजाचा आढावा आयुक्तालयातर्फे वारंवार घेण्यात येतो आहे. विशेष म्हणजे, शहर पोलिसांनी पूर्वतयारी समिती स्थापन करून सिंहस्थातील कामांच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. त्यानुसार, सिंहस्थ कालावधीत नाशिक शहरातील साडेतीन हजार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह महाराष्ट्र व परराज्यातून २० ते २२ हजार पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ मागविण्यासह इतर आराखड्याचे तयार करण्याचे काम सुरू आहे. ही सर्व कामे चोख व वेळेत होण्यासाठी सिंहस्थ कक्षाच्या ‘प्रभारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार संदीप मिटके यांच्यावर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हे, विशेष शाखा व सिंहस्थ कक्ष या तीनही महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी आता मिटके यांच्याकडे आहे.
यासह वरिष्ठ निरीक्षक सोहन माच्छरे हे या पूर्वीपासून सिंहस्थ कक्षात संलग्न आहेत. तर विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की आणि अंकुश चिंतामण यांनाही सिंहस्थ कक्षाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी प्रयागराज येथे पाहणी दौरा केला असून, त्यामध्ये सध्या सिंहस्थ कक्षात नेमलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, सन २०१५-१६ मध्ये झालेल्या सिंहस्थामध्ये नाशिक शहर पोलिसांचे १०५ कोटी रुपयांचे बजेट होते. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नव्हता. तर सन २०२६-२७ मध्ये सायबर पोलिसिंग, तंत्रानेही पोलिसिंग, अद्ययावत वाहनांसह तंत्रज्ञानावर आधारित बंदोबस्ताचा समावेश असणार आहे असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
‘निधी’ला कात्री
बंदोबस्तासाठी येणाऱ्या बाहेरील पोलीस अधिकारी-अंमलदारांच्या निवासासह भोजनाची व्यवस्थाही करावी लागणार आहे. त्यानुसार, अकराशे कोटी रुपयांचा निधी आयुक्तालयास अपेक्षित होता, परंतु, शासनाने ‘बजेट’ला कात्री लावण्यास सांगितल्याने सातशे आठशे कोटीपेक्षाही कमी निधीचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे.
समितीचे सूक्ष्म नियोजन
मागील आठमहिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तालयाने सिंहस्थाकरिता समिती गठीत केली आहे. त्यानुसार, अध्यक्ष म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपाध्यक्ष उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सदस्य सचिव उपायुक्त मुख्यालय व वाहतूक चंद्रकांत खांडवी, सदस्य उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत, गुन्हे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, वाहतूक सहाय्यक आयुक्त पद्मजा बढ़े (अतिरिक्त कार्यभार), प्रशासन सहाय्यक आयुक्त संगिता निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, विशेष शाखेतील सर्व पोलीस निरीक्षकांसह निवृत्त सहाय्यक आयुक्त दिनेश बर्डेकर यांचा समावेश आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा