नाशिक | प्रतिनिधी
पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस अंमलदार आता आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ चा वापर करण्यास सक्षम होणार आहे. कारण, या अंमलदारांना एआयच्या विविध अॅपची माहिती देऊन ते वापराची माहिती देण्याचे प्रशिक्षण टप्प्याटप्याने देणे सुरु करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांना कार्यालयीन कामासह गुन्हे तपासाकरीता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर हळूहळू करावा लागणार आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत विविध शाखांच्या ठराविक कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि. २५) ‘एआय’ वापराचे धडे देण्यात आले. तर आज, बुधवारी (दि. २६) सर्व पोलिस ठाण्यांत ‘एआय’ संदर्भातील तासिका झाली आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार (बीएनएस) सात वर्षपिक्षा जास्त वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसह मध्यम ते गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांत ‘फॉरेन्सिक’ पथकाचा पंचनामा अनिवार्य आहे. प्रत्येक गुन्ह्याच्या
तपासात तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्यात येत आहे. यासह ‘स्पॉट पंचनामा ‘वेळी व्हिडिओ व फोटो संकलित करून त्याचदिवशी ‘क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम’ (सीसीटीएनएस) बर अपलोड करणेही बंधनकारक आहे. त्यासाठी काही महिन्यांपासून पोलिसांना अमेरिकेतील एका कंपनीचे ‘थ्रीडी स्कॅन लेझर’ यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आहे. त्यामध्ये ‘लेझर बीम’ टेक्नॉलॉजीचा वापर; अंधारातही मोजमाप शक्य असून, मूळ घटना घडलेल्या ठिकाणापासून ३६० अंशांतील सर्व वस्तू, अंतराचे मापनही शक्य आहे.
त्यातच, पोलिसिंगमध्येही तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये शंभर दिवसांच्या कार्यक्रमात पोलिसांना तंत्रस्नेही करण्यावर नाशिक पोलीस आयुक्तालयाने भर दिला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी ‘एआय’च्या प्रशिक्षण वर्गाचे नियोजन केले आहे. त्यानुसार प्रशिक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे.
यासाठी गरज
नवीन बीएनएससह भारतीय पुरावा कायद्यान्वये खुनासह प्रत्येक गंभीर गुन्ह्यात ‘स्पॉट पंचनामा’ वेळी व्हिडिओ व फोटो बंधनकारक केले आहेत, त्यासाठी ‘फॉरेन्सिक’ पथक पुरावे संकलित करुन पोलिसांसमक्ष पंचनामा पूर्ण करतील. यासंदर्भातील चार मिनिटांचे व्हिडिओ पोलिसांना ‘सीसीटीएनएस’वर अपलोड करावे लागतील. त्यामध्ये पंचनाम्याची तारीख व वेळ नोंद होईल. विशेष म्हणजे, घटनास्थळावरुनच व्हिडिओ अपलोड करणे अनिवार्य आहे. नेटवर्कची समस्या असल्यास त्याची नोंद करून पोलीस ठाण्यातून व्हिडिओ अपलोड करण्याची मुभा आहे. यासह पोलिस ठाण्यांमार्फत प्रत्येक प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) अपलोड करण्यात येते. यामध्ये आता व्हिडिओ अपलोड करण्यासह ई-मेल, मोबाइल क्रमांक अनिवार्य केला आहे. या स्वरुपाच्या कामकाजात ‘एआय’चा वापर महत्त्वपूर्ण असल्याने पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा