Tuesday, November 19, 2024
HomeनाशिकNashik Political : जिल्ह्यातील सायलेंट मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष

Nashik Political : जिल्ह्यातील सायलेंट मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष

प्रचारात व्यक्तिगत मुद्यांवर होता जोर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) विधानसभेच्या १५ मतदारसंघांवर महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची बारीक नजर असून, गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूच्या मोठ्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी झाल्या. मात्र, २० ते ४० वयोगटातील तरुण मतदार सध्या सायलेंट व संभ्रमावस्थेत दिसत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) प्रचारात खालच्या पातळीवर व वैक्तिगत आरोप-प्रत्यारोपांवरच जोर दिसून आला. तर महत्वाच्या मुद्यांवर ज्याप्रमाणे नेत्यांनी बोलायला हवे होते, तसे काही न दिसल्याने तरुण मतदार आता मतदानाच्या दिवशी काय करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज प्रचाराची सांगता झाली. आता २० तारखेला मतदान आणि २३ तारखेला निकाल येणार आहे. त्याच दिवशी खऱ्या अर्थाने मतदारांचा कौल दिसणार आहे. २०१९ ते २०२४ या पाच वर्षाच्या काळात राज्यातील राजकारणात उडालेला गोंधळ, झालेले नवनवीन प्रयोग व तीन वेळा सत्ता स्थापन झाल्याने तरुण मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसत आहे. आपल्या महाराष्ट्रातील राजकारण २०१९ पासून मोठ्या प्रमाणात बदलले आहे. त्यात अनेक चढउतार आले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी शिवसेना-भाजप युतीला सत्तेचा कौल दिला होता, मात्र नंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घरोबा करुन महाविकास आघाडीची स्थापना करून राज्यातील सत्ता काबीज केली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. त्यावेळी राज्यातील जनतेला एक मोठा राजकीय गोंधळ पहायला मिळाला. कारण याच काळात भाजपचे देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा पहाटेला शपथविधी देखील झाला होता. काही तासांसाठीच ते सरकार राहिले हे देखील तितकेच खरे आहे. यानंतर दोन वर्ष साधारण करोना काळ राहिला. करोना संपल्यानंतर पुन्हा राज्यात राजकीय भूकंप झाला.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत तब्बल ४० आम दारांना घेऊन थेट सुरत मार्गे गुवाहाटी गाठली व तिथून गोवा मार्गे महाराष्ट्रात येऊन भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे पुन्हा मतदारांमध्ये चलबिचल सुरू झाली. हे वातावरण स्थिर होत असतांना राज्यात पुन्हा राजकीय भूकंप झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून शरद पवार यांच्याविरुद्ध बंड करून त्यांचे पुतणे तथा पक्षाचे नेते अजित पवार यांनी थेट आपल्या सुमारे ४० आमदारांना घेऊन शिवसेना महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.एका पंचवार्षिकमध्ये राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी झाल्यामुळे मतदारांपुढे मोठा पेच निर्माण झालेला दिसत आहे. आपण मत कोणाला देतो व तो पुढे जाऊन किती पक्ष बदलतो याबाबत देखील विचार आता त्यांच्या डोक्यात येत असल्याचे जाणवत आहे.

स्थानिक कामेही आमदारांकडे

मतदारांमध्ये आमदार, खासदार व नगरसेवक यांच्या कामांबद्दल अधिक माहिती नसल्याचे दिसत आहे. कोणाकडून काय अपेक्षा कराव्यात, कोणाकडून काय काम करून घ्यावे याबाबत देखील चांगली माहिती सामान्य जनतेला नसल्याचे दिसून येते आहे. महापालिकेच्या नगरसेवकांकडून जे काम पाहिजे असेल त्यासाठी आमदार किंवा खासदारांकडे देखील काही जण पाठपुरावा करीत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मतदारांमध्ये जनजागृती सोबतच आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या कामाची यादी देखील पोहोचायला पाहिजे. त्याचप्रमाणे चांगला उमेदवार व सक्षम लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांनी आपल्या मताचा शंभर टक्के वापर करावा हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन देखील देशदूतच्या वतीने करण्यात येत आहे.

अशा असतात जबाबदाऱ्या

स्वच्छता, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, रस्ते सुविधा, पथदीप इतर गरजांसाठी नगरसेवकाकडे नागरिकांनी पाठपुरावा करायला हवा, तर आपल्या आमदाराकडून मतदारसंघातील उद्योग, शिक्षण, कृषी, रोजगार, कर धोरण, अशा मोठ्या स्वरुपातील गोष्टींसाठी राज्य सरकारचे धोरण ठरविण्यासाठी पाठपुरावा हवा. त्याच प्रमाणे खासदारांकडे देशपातळीवर राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय व्यापार, मागासलेल्या वर्गाचा विकास, भ्रष्टाचार व महागाईला आळा, उद्योग, शिक्षण, कृषीला चालना, स्थानिक कामांसाठी विकास निधी व तरुणांसाठी रोजगार निर्मिती, अशा पद्धतीची कामे असतात.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या