नाशिक | Nashik
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या राज ठाकरेंना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर हा पराभव झटकून पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे नाशिकमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मात्र, राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल होताच भाजपच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात (Nashik Central Vidhan Sabha Constituency) सुरुवातीस भाजप, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता होती. या मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे, ठाकरे गटाचे वंसत गीते आणि मनसेचे अंकुश पवार हे तिघे उमेदवार होते. मनसेच्या एन्ट्रीमुळे भाजपच्या उमेदवार फरांदे यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे उमेदवार पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने फरांदे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. यानंतर नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाचे वसंत गीते यांच्यात दुहेरी लढत झाली होती. त्यात फरांदे यांनी १७ हजार ८३५ मतांनी विजय मिळविला होता.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गेल्या काही महिन्यात भारतीय जनता पक्षाशी (BJP) सलगी केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून देखील मनसेला महापालिका निवडणुकीत (NMC Election) बरोबर घेण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये (Nashik) मनसे आणि महायुती एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार का, याची चर्चा आजच्या भेटीतून पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर आमदार फरांदे काय म्हणाल्या?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना आमदार फरांदे म्हणाल्या की, “राज ठाकरे हे राज्याचे नेते असून विधानसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले आहेत. त्यामुळे मी त्यांची भेट घेतली. आगामी कुंभमेळा, नाशिकचा विकास या विषयांवर राज ठाकरे यांची भेटीदरम्यान चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवार मनसेने मागे घेतल्याने मला त्याचा फायदा झाला. पंरतु, याबाबत आज कुठलीही चर्चा झाली नाही”, असे त्यांनी म्हटले.