सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana
सुरगाणा तालुका (Surgana Taluka) हा केंद्र सरकारने (Central Government) आकांक्षित तालुका म्हणून घोषित केला आहे. हि अत्यंत दुर्दैवी तसेच लाजीरवाणी बाब आहे. ज्या लोक प्रतिनिधींनी चाळीस वर्षे सत्ता भोगली त्यांनी विकासाचे कोणतेही काम केले नाही. आपल्याला सुरगाणेकरांनी गेल्या निवडणुकीत विश्वास ठेवला, काम करण्याची संधी दिल्यामुळे सुरगाणा शहरात विकासाची कामे केली. सुरगाणा शहराचा आपल्याला चेहरामोहरा बदलायचा आहे यासाठी मला साथ द्या, असे आवाहन कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार नितीन पवार यांनी सुरगाणा शहरात प्रचार दौऱ्यातं केले.
सुरगाणा शहरातील (Surgana City) मतदारांच्या (Voter) गाठीभेटी घेऊन संवाद साधला. ठिकठिकाणी आमदार पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार पवार पुढे म्हणाले की, सुरगाणा शहरात नवीन पोलीस ठाण्याची इमारत, नवीन विश्रामगृह बांधकाम, नवीन बसस्थानकाचे बांधकाम, तहसिल कार्यालयाचे विस्तारित इमारत, ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणी वर्धन, दुर्गा देवी मंदिर जवळील सामूहिक सांस्कृतिक भवन बांधकाम, शहरातील प्रति अक्कलकोट स्वामी समर्थ केंद्र सुशोभिकरण अशी महत्त्वाची कामे सुरु असून शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे आहेत. विकासाचा हा आलेख पुढे चालू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) आमदार नितीन पवार यांनी यावेळी केले.
आमदार नितीन पवार पुढे म्हणाले की, सुरगाणा हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र शहराला अद्याप तरी अनेक भौतिक सुविधांचा अभाव दिसून येतो आहे. जिल्ह्यातील इतर शहरे विकासाची कात टाकत आहेत. सुरगाणा शहराची अवस्था खुपच दयनीय आहे. तत्कालीन आमदार स्व. ए. टी. पवार यांनी शहरात बसस्थानकाचे बांधकाम केले होते. या खेरीज विरोधकांनी (Opponent) कोणत्याही प्रकारचे काम शहरात केले नाही. सुरगाणा शहरात नियमितपणे पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. भर पावसाळ्यात पिण्याचे शुद्ध पाणी जनतेला उपलब्ध होत नाही. भविष्यात चोवीस तास पिण्याचे पाणी शहरवासीयांना उपलब्ध करुन दिले जाईल. शहरातील गल्ली बोळातील रस्ते, सुरळीत वीजपुरवठा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा पुरविण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले. यावेळी नगरसेवक सचिन महाले, रंजनाताई लहरी, संजय पवार, प्रकाश वळवी, मनोज शेजोळे, जयश्री शेजोळे, आनंदा झिरवाळ, राजेंद्र पवार, रामदास केंगा, तुळशीराम महाले आदी प्रचार सभेत उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा