नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आतापर्यंत दलित मुस्लीम समाजाच्या मतांचा वापर प्रस्थापित पक्षांनी केला असून यापुढे असे होणार नाही. मध्य नाशिकला मुस्लीम आमदार करण्यासाठी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मला उमेवारी दिली आहे. मध्यमधून जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी माझी उमेदवारी असून आपण शंभर टक्के निवडून येणार आहे. असा दावा वंचितचे मध्य नाशिकचे अधिकृत उमेदवार दोन वेळेचे माजी नगरसेवक मुशीर सय्यद (Mushir Syed) यांनी केला आहे.
हे देखील वाचा : Shivsena (UBT) Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर; महिला, शेतकरी ते मोफत शिक्षणासह केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
मुशीर सय्यद यांनी महायुतीसह महाविकास आघाडीचा (Mahayuti and Mahavikas Aaghadi) समाचार घेत हल्लाबोल केला. मागच्या वर्षी पवित्र रमजानमध्ये उपनगर भागात एकाने पैगंबर साहेबांबद्दल चुकीची पोस्ट केल्यामुळे पोलिसांनी दोषीवर कारवाई करावी, यासाठी मुस्लीम तरुणांनी उपनगर पोलीस ठाण्यावर धाव घेतली होती. मात्र भाजपच्या आ. देवयानी फरांदे यांनी त्याला वेगळे वळण देऊन त्या ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे दाखवण्यात आले असा आरोप करुन शहरातील मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तर १६ ऑगस्ट रोजी जुन्या नाशकात झालेल्या दंगली भाजपच्या लोकांसह महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या (Candidate) लोकांचा देखील सहभाग होता असा आरोप सय्यद यांनी करुन बांगलादेशातील हिंदू असो की फिलिस्तीनमधील मुस्लीम कोणावरही अन्याय झाल्यास त्याचा निषेध आम्ही करणार, मात्र काही हिंदुत्ववादी लोकांनी शुक्रवार (जुमा) ची नमाजच्या वेळी मुस्लीम भागातील मशिदींसमोर येऊन घोषणाबाजी करुन वातावरण खराब करण्याचे काम केले. त्यावेळी ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांच्या बरोबर राहणारे लोक देखील सोबत होते, असा दावा सय्यद यांनी यावेळी केला.
हे देखील वाचा : Nashik Political : देवयानी फरांदे यांना वाढता पाठिंबा; विविध संस्था, संघटनांचे पाठबळ
एकीकडे दलित मुस्लीम मतांवर (Vote) निवडून यायचे व दुसऱ्या बाजुला त्यांना त्रास देण्याचे काम या दोन्ही उमेदवारांकडून करण्यात येत आहे, म्हणून मी आता मैदानात आलो व यापुढे त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे सय्यद यांनी सांगितले.माझी लढाई भाजपच्या आ.फरांदे यांच्या विरोधात आहे. त्यामुळे दलित-मुस्लिम समाजाने आलेली संधी सोडू नये व मुस्लीम आमदार मध्य नाशिकमधून करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. येथे सुमारे ८० हजाराच्यावर मुस्लीम तर सुमारे ५५ हजार मते वंचित बांधवांची आहे. दोन्ही समाजाने एकत्रित येऊन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, त्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हे देखील वाचा : Nashik Political : बहिणीला ओवाळणी म्हणून आमदारकी देऊ – जाधव
वक्फ कायद्यासंदर्भात लोकसभेत (Loksabha) विधेयक मांडण्यात आले, त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी काही न बोलता सभागृह सोडले, त्याचप्रमाणे ठाकरे गटाला मुस्लीम समाजाने भरभरून मतदान दिले तरी ते मुस्लीम समाजाबद्दल काही बोलायला तयार नाही. त्यांना फक्त समाजाची मते हवी आहे, मात्र काम नको. जुने नाशिकच्या दंगलीत देखील त्यांनी कुठेही आपला सहभाग शांतता प्रास्थापीत करण्यासाठी घेतला नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने भरपूर मतदान करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला खासदार केले, त्यात माझी भूमिका देखील महत्वाची होती. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी देखील दलित मुस्लीम समाजाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप सय्यद यांनी केला.
हे देखील वाचा : Nashik News : बागलाण, मालेगाव बाह्य, इगतपुरीत लागणार दोन मतदान यंत्रे
दंगलीच्या वेळी खासदारांना फोन केल्यावर मी तिकडे येणार नाही मी थेट पोलीस आयुक्तांकडे जाणार अशी भूमिका घेतल्यामुळे समाजात नाराजी आहे. त्यामुळे ही वेळ आली असून त्यांना त्यांची जागा दाखवून द्या व मला आमदार म्हणून विधानसभेत पाठवा तुम्हाला नाराज करणार नाही, असा शब्द देतो, असे म्हणून सय्यद यांनी मतदारांना आवाहन केले. मुशीर सय्यद यांच्या समर्थनार्थ अशोका मार्गावरील जलसा हॉलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम -दलित बांधव व महिला उपस्थित होते. तरुणांची उपस्थिती लक्षणीयं होती. अध्यक्षस्थानी वंचितचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख वामन गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते संजय साबळे, समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष इमरान चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी समाजवादी पार्टीने सय्यद यांना पाठिंबा जाहीर केला.
हे देखील वाचा : झिरवाळांमुळे जांबुटकेत जमिनीला सोन्याचे भाव : अपसुंद
हक्काचा माणूस मुशीर सय्यद : संजय साबळे
मुशीर सय्यद यांच्याबरोबर नाशिक मनपात नगरसेवक म्हणून आपण काम केले आहे. हक्काचा माणूस म्हणून सय्यद हे सर्व समाजाची कामे करतात. त्यांच्याकडे विकासाचे चांगले व्हिजन असून त्यांनी जुने नाशिकमध्ये विकास करुन दाखवला असून आता त्यांना मध्य नाशिकचा आमदार म्हणून विधासभेत पाठविण्याची जबाबदारी आपली असून दलित व मुस्लीम समाजाने पुढे येऊन त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन वंचित आघाडीचे नेते तथा माजी नगरसेवक संजय साबळे यांनी यावेळी केले.
मुशीर सय्यद यांना निवडून आणा : वामन गायकवाड
मध्य नाशिकमधून पहिला मुस्लीम आमदार करण्यासाठी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तरुण तडफदार माजी नगरसेवक असलेल्या मुशीर सय्यद यांना उमेदवारी दिली असून आता दलित-मुस्लीम समाजाने आपली जबाबदारी पार पाडून सय्यद यांना भरघोस मतांनी मध्य नाशिकमधून निवडून देण्याचे आवाहन वंचितचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख वामन गायकवाड यांनी केले. त्यांनी सांगितले की आपण राज्यातील निवडक जागांवर आपले उमेदवार उभे केले असून त्यात मध्य नाशिकची एक जागा आहे.
बड़ी दरगाह येथे चादर
सभेपूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार मुशीर मुनिरोद्दिन सय्यद यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ पवित्र बड़ी दरगाह शरीफ येथे फुलांची चादर चढवून व दुवा करुन केला. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योत महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा