Tuesday, November 3, 2026
HomeनाशिकNashik Shivsena News : शिवसेनेची मंत्रिपदापासून उपमहापौरपदापर्यंत सत्ता; मात्र पक्ष कार्यालयाचे भाडे...

Nashik Shivsena News : शिवसेनेची मंत्रिपदापासून उपमहापौरपदापर्यंत सत्ता; मात्र पक्ष कार्यालयाचे भाडे थकल्याची चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात आणि नाशिक महानगरपालिकेत (Nashik NMC) सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) नाशिकमधील (Nashik) पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना सध्या पक्षाच्या अधिकृत कार्यालयाअभावी कामकाज करावे लागत आहे. पक्षाचे जिल्ह्यात दोन आमदार, राज्यात कॅबिनेट मंत्रिपद आणि महापालिकेत उपमहापौरासह २६ नगरसेवकांचे संख्याबळ असतानाही पक्षाला शहरात कायमस्वरूपी कार्यालय उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि नगरसेवकांना आपापल्या खासगी कार्यालयांतून तसेच महापालिकेतून नागरिकांच्या समस्या सोडवाव्या लागत आहेत.

- Advertisement -

अखंड शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे कामकाज सुरू केलेल्या शिवसेनेने सुरुवातीला शहरातील मायको सर्कल परिसरात भाडेतत्त्वावर पक्ष कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर सुमारे सहा महिन्यांपूर्वी बी. डी. भालेकर मैदानाजवळील एका इमारतीत पक्षाचे कार्यालय सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या महिनाभरापासून हे कार्यालय बंद असल्याची चर्चा आहे. कार्यालयाचे भाडे थकल्यामुळे जागामालकाने जागा खाली करण्यास सांगितल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत कार्यालयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे जिल्ह्यात दोन आमदार (MLA) असून, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या रूपाने नाशिकला कॅबिनेट मंत्रिपदही मिळाले आहे. महापालिकेत उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक कार्यरत आहेत. पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडविणे, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे आणि संघटनात्मक कामकाजासाठी कार्यालय महत्त्वाचे मानले जाते. मात्र, सध्या पदाधिकाऱ्यांना स्वतःच्या खासगी कार्यालयांतूनच नागरिकांशी संपर्क साधावा लागत असल्याचे चित्र आहे. सत्तेत असूनही पक्ष कार्यालयाची व्यवस्था नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही याबाबत चर्चा सुरू आहे.

उपमहापौरांचा दावा काय?

भालेकर मैदानाजवळील कार्यालय बंद नसून तेथून नियमित कामकाज सुरू असल्याचा दावा उपमहापौर विलास शिंदे यांनी केला आहे. या ठिकाणी पक्षाच्या बैठका होत असून, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेला कायमस्वरूपी पक्ष कार्यालय कधी मिळणार?

एकीकडे सत्तेतील सहभाग, लोकप्रतिनिधींचे संख्याबळ आणि मंत्रिपदाची ताकद असताना दुसरीकडे पक्ष कार्यालयाच्या उपलब्धतेवरून निर्माण झालेला संभ्रम चर्चेचा विषय ठरत आहे. नवीन कार्यालय सुरू होण्याच्या शहराध्यक्षांच्या घोषणेनंतर आता शिवसेनेला नाशिकमध्ये कायमस्वरूपी पक्ष कार्यालय कधी मिळणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पक्षाचे  कायमस्वरूपी स्वतंत्र कार्यालय असावे आणि वारंवार जागा बदलण्याची वेळ येऊ नये, यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील तीन ते चार ठिकाणी जागांची पाहणी करण्यात आली असून, दिवाळीनंतर नवीन कार्यालय सुरू करण्याचे नियोजन आहे.

बंटी तिदमे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक शिवसेना

ताज्या बातम्या

मुरासू

मुरासू चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलं; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पावसाचा इशारा

0
पुणे | प्रतिनिधीबंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'मुरासू' हे चक्रीवादळ तीव्र वेगाने किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून त्याचे रूपांतर अत्यंत भीषण चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या...