Thursday, July 16, 2026
HomeनाशिकNashik Shivsena UBT News : आमची निष्ठा पक्षासोबतच, मुळीच फुटणार नाही! नाशिकच्या...

Nashik Shivsena UBT News : आमची निष्ठा पक्षासोबतच, मुळीच फुटणार नाही! नाशिकच्या नगरसेवकांचा ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंना शब्द

मुंबई | Mumbai

आम्ही कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही आणि पक्षासोबतच राहू. विकास निधीच्या नावाखाली पक्षांतराचे कितीही आमिष दाखवले, तरी आमची निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशीच राहील, असा ठाम शब्द नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) नगरसेवकांनी आज (बुधवारी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला. ठाकरे सेनेच्या १५ नगरसेवकांनी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा निर्वाळा दिला.

- Advertisement -

जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक व्हा, उद्धव ठाकरेंचा कानमंत्र

या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील (Nashik) संघटनात्मक परिस्थिती, स्थानिक राजकारण आणि आगामी निवडणुकांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “विरोधकांनी रचलेला हा डाव निष्फळ ठरवल्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे. सध्या पक्ष संक्रमणावस्थेतून जात असला, तरी काही दिवस धीर धरा, आपल्याला निश्चितच गतवैभव प्राप्त होईल,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहून अधिक जोमाने कामाला लागा. कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवा आणि जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवा. तसेच पक्षाची अधिकृत भूमिका तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर द्या,असेही त्यांनी सांगितले.

नगरसेवकांची एकीची ‘वज्रमूठ’

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील उबाठा गटाचे १५ पैकी १२ नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. फुटीर नगरसेवक नेमके कोण, यावर खमंग चर्चा सुरू होत्या. मात्र, गटनेते केशव पोरजे यांनी तात्काळ स्वकीयांची ‘वज्रमूठ’ आवळत आम्ही सारे सोबत असल्याचा विश्वास दिला होता, तर संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनीही नाशिकला धाव घेत ऐक्याचा नारा दिला होता. आज सर्व नगरसेवकांनी थेट मुंबईत ठाकरेंची भेट घेऊन विरोधकांचा पक्षांतराचा डाव उधळून लावला.

नाशिकच्या समस्यांवरून उद्धव ठाकरे करणार नाशिक दौरा

नाशिकमध्ये सध्या प्रशासकीय राजवट असूनही शहरातील अनेक नागरी समस्या ‘जैसे थे’ असल्याकडे नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंचे लक्ष वेधले. बेसुमार वृक्षतोड, जागोजागी खोदून ठेवलेले रस्ते, त्यामुळे होणारे अपघात व मृत्यू, शहरातील वाहतूक कोंडी आणि स्थानिक लोकांना डावलून परराज्यातील कंत्राटदारांना दिली जाणारी कामे, या गंभीर विषयांवर बैठकीत ऊहापोह झाला. या संदर्भात संबंधित प्रशासकीय व्यवस्थेला थेट जाब विचारण्यासाठी आपण लवकरच नाशिकचा दौरा करणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीला शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, मनपा गटनेते केशव पोरजे यांच्यासह नगरसेवक वैशाली दळवी, योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे, शैलेश ढगे, सीमा पवार, प्रमिला मैंद, मंगला आढाव, रुचिरा साळवे, योगेश भोर, वैशाली दाणी, संजीवनी हांडोरे, मुरलीधर भामरे आणि माधुरी ढेमसे आदी उपस्थित होते.

चर्चांना पूर्णविराम, नगरसेवकांमध्ये नवा उत्साह

आधीच्या काही चर्चांमध्ये बैठकीला स्थानिक पदाधिकारी उपस्थित नसल्याचे बोलले जात होते, मात्र जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी आणि महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे नाशिक उबाठा गटातील अंतर्गत वादाच्या आणि नगरसेवकांच्या फुटीच्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पक्षप्रमुखांच्या भेटीनंतर सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी नव्या उत्साहाने संघटनात्मक कामात सक्रिय झाले आहेत.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela 2027 : ‘कुंभ स्किलिंग प्रकल्पा’ला राज्य कौशल्य विकास संस्थेची...

0
जिमाका वृत्तसेवा आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ सुरळीत, सक्षम आणि दर्जेदार पद्धतीने पार पाडण्यासाठी स्थानिक युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे....