नाशिक | Nashik
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Local Body Election) सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गट फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केले आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही (Ajit Pawar) आपली मोहीम सुरू केली असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाशकात मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक नाना महाले (Nana Mahale) यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले आहे. आपल्या विविध समर्थकांसह नाना महाले यांनी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. त्यामुळे नाशिक शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
तसेच पक्ष प्रवेशानंतर नाना महाले यांच्या समर्थकांनी ‘घड्याळ तेच वेळ नवी’ असे म्हणत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांचे तटकरे यांनी स्वागत केले. नाना महाले महापालिकेचे माजी नगरसेवक असून त्यांचे बंधू देखील तीन वेळा नगरसेवक (Corporter) होते. त्यामुळे आता महाले यांच्या पक्षप्रवेशाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शहरात अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाले यांच्यासोबत मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, अक्षय परदेशी, राहुल कमानकर, ज्ञानेश्वर महाजन, सुनील घुगे, सुनील अहिरे, राजेंद्र पवार, अरुण निकम यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्य व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते.