Friday, October 18, 2024
HomeनाशिकPolitical Special : नाशिक 'मध्य' वरुन मविआत तिढा?; इगतपुरीत खोसकरांसमोर काँग्रेसचे आव्हान

Political Special : नाशिक ‘मध्य’ वरुन मविआत तिढा?; इगतपुरीत खोसकरांसमोर काँग्रेसचे आव्हान

नाशिक | भारत पगारे
नाशिकच्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर महाविकासच्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसह वरिष्ठांची डोकेदुखी वाढली असून तिकीट कोणाला सोडायचे यावर खलबते सुरू झाली आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे इगतपुरी- त्र्यंबक मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी क्रॉस व्होटिंग करत पक्षाशी केलेल्या गद्दारीमुळे त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी ‘नाद’ पूर्णच करायचा म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ‘रात्रीस खेळ’ मांडून उमेदवारी फायनल करवून घेतली आहे. दरम्यान, खोसकरांसमोर मात्र माजी आमदार निर्मला गावित यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यादृष्टीने गावितही तयारीला लागल्या आहेत.

नाशिक शहरातील मध्य नाशिक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गिते यांच्यासह संजय चव्हाण आणि इतरांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून २०१९ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या डॉ. हेमलता पाटील यांच्यासह पक्षातील माजी नगरसेवक राहुल दिवे, गुलजार कोकणी, हनिफ बशीर आदींनी आमदारकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २००४ ते २००९ इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघापर्यंत नाशिकमध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छाव आमदार होत्या, तर २००९ मध्ये ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र झाला. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वसंत गिते आमदार झाले होते.

- Advertisement -

तसेच २०१४ पासून आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या देवयानी फरांदे या मतदारसंघाच्या आमदार आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत चित्र पूर्णतः पालटले असून पूर्वी ‘युती विरुद्ध आघाडी’ असा संघर्ष होता तर आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष जोर धरतो आहे. मध्यसाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रयत्न करतो आहे. त्यातच काँग्रेस व ठाकरे गटाने या जागेसाठी दावा केल्यामुळे मध्य नाशिकची जागा कोणाला सुटणार याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ दलित-मुस्लीम आदी मतांवर काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जातो. त्यामुळे काँग्रेसने दावा केल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मतदानातून मिळालेला ‘लीड’ पाहता ठाकरे गटानेदेखील दावा सांगितला आहे.

दुसरीकडे इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघातही मोठी घडामोड शक्य आहे. माजी आमदार निर्मला गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे बंडखोर आमदार हिरामण खोसकर यांनी तिकिटासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे मुलाखती दिल्या. मात्र त्यांना दोन्ही ठिकाणांहून थेट बाहेरचा रस्ता दाखवत डच्चू मिळाल्याने त्यांनी रात्रीच ‘गुलाबी’ अजित दादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर आता खोसकरांविरोधात माजी आमदार निर्मला गावित यांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. गावित यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. गावित सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत.

दरम्यान, क्रॉस व्होटिंग करून पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप असलेल्या खोसकरांनी काँग्रेसवर आगपाखड करून गावितांच्या पक्ष प्रवेशासाठीच काँग्रेसने माझ्यावर अन्याय केल्याचे म्हटले आहे. हा सर्वच उटारेटा सुरू असताना काँग्रेस पक्षात राहून गद्दारी करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाई करण्याकडे काँग्रेसने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्याचा फटका नेमका कुणाला बसणार हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. तर खोसकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा गावित यांनी केला होता. काँग्रेस पक्षप्रवेशाबाबत अद्याप पक्षाकडून बोलावणे नाही. नाना पटोले यांच्याशी सहा महिन्यांपूर्वी बोलणे झाले होते, मात्र त्यानंतर नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशीदेखील उमेदवारीबाबत चर्चा केल्याची माहिती निर्मला गावित यांनी दिली. त्यामुळे आजी-माजी आमदार समोरासमोर लढणार आहेत, हे सध्या तरी दिसत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या