नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा (Guardianship of Nashik and Raigad) तिढा कायम असून येत्या दोन दिवसात त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यात नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) कायम होणार असल्याचे समजते, तर शिवसेनेचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळणार असल्याचे समजते. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभुमीवर नाशिकला लवकरात लवकर पालकमंत्री मिळणे गरजेचे असल्याने मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत घोषणा करणार असल्याचे वृत्त आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये (Mahayuti Government) नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांवरून वाद सुरु आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी या निर्णयाला विरोध दर्शविल्याने महाजन यांच्या नियुक्तीला ब्रेक लागला आहे. तर रायगड जिल्ह्यात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, तेथे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मंत्री आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता येत्या दोन दिवसात सुटण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन कायम राहणार असून शिवसेनेचे दादा भुसे हे सहाय्यक म्हणून असणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) राष्ट्रवादीच्या सात आमदारांपैकी दिंडोरीचे नरहरी झिरवाळ तसेच सिन्नरचे अॅड. माणिकराव कोकाटे या दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेले आहे. तर भाजपचे पाच आमदार (MLA) असताना त्यांनी एकही मंत्री पद घेतले नाही. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद भाजपकडे राहणार आहे. महायुती सरकाराच्या पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना मालेगावचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री झाले होते.
मात्र, २०२४ च्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे पुन्हा सरकार आले मात्र मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदी त्यांनी महाजन यांची नियुक्ती केली होती. यानंतर अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर नाशिकला पालकमंत्री मिळणे गरजेचे झाले आहे. विभागीय महसूल आयुक्तांपासून जिल्हाधिकारी, नाशिक महापालिका प्रशासन सतत सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करीत आहे. हजारो कोटींचा आराखडा देखील तयार आहे, मात्र ते पुढे सरकत नसल्यामुळे पालकमंत्री लवकरात लवकर मिळावे ही अपेक्षा आहेत.
रायगडचा तिढा शिंदे-पवार बसून सोडवणार
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असला तरी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न कायम आहे. तो रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून सोडवावा, असे आदेश दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा देखील लवकरच सुटण्याची शक्यता आहे.