नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी (Nagarparishad Election) नामांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. रविवार (दि. १६) पर्यंत नगराध्यक्षपदाच्या (Town Council President) ११ जागांसाठी ६० तर २६६ नगरसेवकपदांसाठी ९८० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. आज (दि.१७) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
गेल्या ७ दिवसांपासून नामांकन प्रक्रिया सुरू आहे. मात्र, युती आणि आघाडीच्या निर्णयातील विलंबामुळे राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी अनेक उमेदवार ‘थांबा आणि पाहा’च्या भूमिकेत राहिले. अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर पक्षीयस्तरावर हालचाली वेगवान झाल्या आहेत. शेवटच्या दिवशी अर्जाची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
रविवारी सातव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी ३२ तर नगरसेवकपदासाठी ५५५ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर दाखल झालेल्या अर्जाची १८ नोव्हेंबरपर्यंत छाननी होणार आहे.त्यानंतर वैध अर्जाची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना माघारीसाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत राहणार आहे. यानंतर मात्र खऱ्या अर्थान निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. राजकीय पक्षांना बंडखोरी थोपवणे तसेच एकच उमेदवार देण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार, असे चित्र आहे.
दरम्यान, मोठ्या प्रतीक्षेनंतर निवडणुकांना मुहूर्त लागला आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली आहे. एकीकडे युती आघाडीबाबतच्या राजकीय घडामोडींकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे आज अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुक उमदेवारांची धावपळ सुरु आहे.
रविवारपर्यंतची अर्जस्थिती
| पालिका | नगराध्यक्ष | नगरसेवक |
| इगतपुरी | २ | १८ |
| नांदगाव | १ | २० |
| भगूर | १ | ६० |
| ओझर | ३ | ७३ |
| त्र्यंबकेश्वर | १२ | १७२ |
| पिंपळगाव (ब) | १० | १३३ |
| मनमाड | ० | ५६ |
| येवला | ६ | ७२ |
| सटाणा | ११ | ११६ |
| चांदवड | ११ | १०६ |
| एकूण | ६० | ९८० |




