नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदेच्या निवडणुका (Nagarparishad Election) रंगतदार बनू लागल्या असून, सोमवारी उमेदवारांनी समर्थकांच्या प्रचंड गर्दीत उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटचा दिवस असल्याने प्रशासन कार्यालयांवर मोठी गर्दी उसळली होती.
११ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी (Town Council President) तब्बल ८३ अर्ज, तर सदस्य पदांसाठी १४२५ अर्ज दाखल झाल्याचे एकूण चित्र आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असतांनाही निवडणूक आयोगाने या दोन्ही दिवशी अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी या दोन्ही दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते.
सिन्नरला नगराध्यक्षासाठी १४ तर नगरसेवकासाठी २१७ अर्ज
सिन्नर नगरपरिषदेसाठी (Sinnar Nagarparishad) अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी (दि.१७) शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकुण १४ तर नगरसेवक पदासाठी एकुण २१७ अर्ज दाखल झाले. सोमवारी शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ८७ अर्ज दाखल झाले. तर नगराध्यक्ष पदासाठी ६ जणांनी अर्ज दाखल केले.
निवडणूकीचा बिगूल वाजल्यापासून इच्छूकांमध्ये उमेदवारीसाठी चुरस बघायला मिळाली. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे ४ दिवस एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाले नव्हते. मात्र, पाचव्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. शेवटच्या दिवसांपर्यंत पक्षांकडून अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु होती. सुरुवातीला दोन गटांमध्ये वाटणारी निवडणूक शेवटच्या दिवशी ४ गटांमध्ये होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
नगराध्यक्षपदासाठी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) गटाकडून माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, खासदार राजाभाऊ वाजे गटाकडून माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, भाजपकडून माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे व शिवसेना शिंदे गटाकडून नामदेव लोंढे यांनी अर्ज दाखल केले. तर अपक्ष म्हणून किशोर देशमुख, हर्षद देशमुख यांच्यासह इतरांनी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी ९ जणांचे १४ अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदासाठी एकुण २१७ अर्ज दाखल झाले आहेत.
कम्युनिस्ट पक्षाकडून प्रभाग ३ मधून हरिभाऊ तांबे यांनीही सोमवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी (दि.१८) अर्जाची छाननी व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी बुधवार (दि.१९) पासून २५ नोव्हेंबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.





