नाशिक | Nashik
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मराठी माणसांसाठी आमच्यातील वाद किरकोळ असून, मी महाराष्ट्राच्या (Maharashtra) हितासाठी माझा इगो बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
राज ठाकरे यांनी घातलेल्या सादीनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील तत्काळ प्रतिसाद दिला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नव्या समीकरणांची चाहूल लागू लागली आहे. या दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशा आशयाचे फलक राज्यातील विविध शहरांत लागले आहेत. यात एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकमध्ये लागलेल्या फलकाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगत आहे.
नाशिक येथील शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसैनिकांनी फलक लावून उद्धव ठाकरे यांना मनोमिलनासाठी विनंती केली आहे. तसेच आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. अनेक दबाव आणि अमिष आले तरी डगमगलो नाही. आगामी काळात उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सज्ज आहोत, असे या फलकावर लिहिले आहे.
तसेच तुम्हीच राज ठाकरेंना मातोश्रीचे (Matoshree) निमंत्रण देत महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्यावी, असे आवाहन या समर्थकांनी उद्धव ठाकरेंना फलकाद्वारे केले आहे. नाशिकमधील (Nashik) हे फलक सर्वांचेच लक्ष वेधत आहे. मात्र, आता उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या विनंतीला मान देतील का हे बघणं औत्सूक्याचे ठरणार आहे.