नाशिक | Nashik
ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर कोणत्या पक्षात जाणार, याकडे नाशिकच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. अखेर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा आज (मंगळवारी) भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
मुंबईत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नायना घोलप, माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्यासह आदी माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दुसरीकडे भाजपा आमदार सीमा हिरे (MLA Seema Hiray) ययांच्यासह काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला जोरदार विरोध केला होता. मात्र, त्यानंतरही हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या सर्व घडामोडींवर भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट लिहिली असून, ती चर्चेचा विषय ठरली आहे.
केदार पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले आहेत?
होय, भाजप वॉशिंग मशिन आहे. इतर राजकीय पक्षांमधुन भाजपात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजपाचे प्राथमिक सदस्य होण्यास काहीही अटी शर्ती नाही. त्याकरिता मो.नं.८८००००२०२४ डायल करून ऑनलाईन पद्धतीने देशातील कोणालाही भाजपचे प्राथमिक सदस्य होता येते. तथापि भाजपची कार्यपद्धती पहाता जे जे पक्षात येतील त्यांच्या कोणत्याही अटी शर्ती नसतील. त्यांना भाजपची कार्यपद्धती,ध्येय धोरणे अंगिकारावीच लागतील. तरच ते भाजपात येतील. इतिहास साक्षी आहे की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. त्यानुसार वॉशिंग मशीनचा अर्थच असा आहे की त्यांनी मागचा इतिहास सोडुन भाजपची कार्यपद्धती अंगिकारली पाहिजे. त्याप्रमाणे जर भाजप करत असेल तर काय हरकत आहे. शेवटी लोकशाही पध्दतीच्या राजकारणात डोक्याला जितके महत्त्व आहे तितकेच महत्व त्या पक्षात डोके किती संख्येने जास्त आहेत ते पण तितकेच महत्वाचे आहे. तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार विश्वासदर्शक ठरावात एका मताने पडले होते. त्यानंतर पंतप्रधान पदाच्या पदावर संगीत खुर्चीचा खेळ सुरु झाला होता. त्यामुळे देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजपात कोणी येत असेल व पक्षाची रचना व कार्यपद्धती अंगिकारत असेल तर काय हरकत आहे, असे केदार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.




