Saturday, May 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : भाजपकडून बाराशे इच्छुकांच्या मुलाखती; सर्व पक्षांचे रेकॉर्ड मोडीत

Nashik Politics : भाजपकडून बाराशे इच्छुकांच्या मुलाखती; सर्व पक्षांचे रेकॉर्ड मोडीत

दिग्गजांची उमेदवारीसाठी सत्त्वपरीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाचा (BJP) शंभर प्लसचा नारा सफल होण्यासाठी नाशिक महानगरातील (Nashik Corporation) बाराशे जणांनी मुलाखती (Interview) देऊन आजपर्यंतचे पक्षीय मुलाखतीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे. मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी पूर्व विधानसभा मतदार संघातील प्रभाग १ १,२,३,४,५,६ १७,१८,१९,२०,२१,२२ मधील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. प्रभाग दोनमधून ५२ जणांनी इच्छा प्रदर्शित करत मुलाखती देऊन निवड समितीसमोर आणखी मोठे आव्हान उभे केले.

महापालिका निवडणुकीतील (NMC Election) उमेदवार निवड प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग म्हणून गेल्या चार दिवसात बारशे जणांच्या मुलाखती आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, विजय साने, लक्ष्मण सावजी, सुनील केदार, सुधाकर बडगुजर, सुहास फरांदे यांनी घेतल्या. कोणत्याही प्रकारचे शक्ति प्रदर्शन करण्यास मनाई असली तरी आपल्या सांपत्तिक स्थितीचे प्रदर्शन करण्यास मनाई नसल्याने त्याचेही दर्शन काही जणांनी घडवले. कारण सर्व पात्रता असली तरी तुमची आर्थिक क्षमता किती हा महत्त्वाचा प्रश्न असल्याने काही जणांनी तुम्ही फक्त सांगा असे उत्तर देऊन आपली आर्थिक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मोठ्या प्रमाणावर कोणीही समर्थक आणले नाही. इच्छुकांनी मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि भरलेली प्रश्नावली भरुन दिली. बुधवारी मुलाखत देणाऱ्यांमध्ये माजी महापौर रंजना भानसी, अशोक मुर्तडक, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, दिपाली गिते, माजी सभागृह नेते कमलेश बोडके, उत्तम उगले, हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, महेंद्र बडवे आदींचा समावेश होता. इच्छुकांची संख्या एवढी मोठी होती की, रात्री दहापर्यंत मुलाखती सुरु होत्या.

प्रा. फरांदे दीर्घकाळानंतर कार्यालयात

पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. सुहास फरांदे गेल्या दोन-तीन वर्षापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहत नव्हते. बुधवारी प्रथमच ते वसंत स्मृतीमध्ये मुलाखती घेण्यास व्हील चेअरवरुन आले. तेव्हा त्यांना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

मागचा फोटो कोणाचा?

बरेच हौशे नवशे मुलाखतीस आले होते. त्यात काही नवखे इतर पक्षातून आलेलेही होते. त्यांना मुद्दाम पक्षाचा स्थापना दिवस कोणता ? कार्यालयात आमच्या मागे कोणाचा फोटो आहे, असे विचारले होते. तेव्हा त्यांना मुखर्जी नाव तर माहिती होते. मात्र, ते श्यामाप्रसाद मुखर्जी की प्रणव मुखर्जी ? हे मात्र सांगताना गोंधळात पडत होते. त्यामुळे मुलाखत घेणार्‍यांचीही चांगलीच करमणूक झाली.

कामे.. अजून नाही केली

मुलाखती घेत असतांना काही उमेदवारांना त्यांनी कोणती कामे केली? असा प्रश्न विचारला. तेव्हा एकाने सांगितले की, आतापर्यंत पक्षाने दिलेले काम केले. मात्र, सार्वजनिक काम अजून नाही केले. त्यासाठीच तर नगरसेवक व्हायचे आहे, असे सांगितले.

कोणता झेंडा घेऊ हाती

जागा १२२ इच्छुक बाराशे यामुळे आपल्या उमेदावारीची डाळ कितपत शिजेल याबाबत अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे प्लॅन ‘बी’ अर्थात दुसरा पर्याय तयार असावा म्हणून काही जणांनी महायुतीतीलच मित्र पक्षांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. महायुतीत लढल्यास किमान नाराजांचे पाठबळ तरी आपल्या पाठीशी कायम राहील असा त्यांचा कयास आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना फारसे भवितव्य दिसत नाही. शिंदे गटाला प्राधान्य देतांना दिसत आहेत.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...