नाशिक | Nashik
मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) राज्यात महायुती सरकारला (Mahayuti Government) घवघवीत यश मिळाले होते. त्यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असता त्यात नाशिक जिल्ह्यातून तिघांना संधी देण्यात आली. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचा समावेश होता.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी २६ जानेवारीच्या आधी राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये नाशिकची जबाबदारी भाजपच्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना देण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज झाले होते. कारण ते नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे यांच्या नावासाठी आग्रही होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती देत नाशिकच्या पालकमंत्रीपदी कुणाचीही नियुक्ती केली नाही. तेव्हापासून नाशिकचे पालकमंत्रीपद खाली आहे.
दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिपदासाठी डावलण्यात आले होते. त्यामुळे भुजबळ नाराज झाले होते, तसेच त्यांनी आपली ही नाराजी माध्यमांसमोर वेळोवेळी बोलून देखील दाखवली होती. नुकतीच काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यानंतर त्यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली. यानंतर आता भुजबळ अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी काल (शनिवारी) नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असताना द्वारका परिसरात सुरु असणाऱ्या कामकाजाची पाहणी केली. तसेच जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी भुजबळ फार्म हाऊसवर त्यांची भेट घेतली. यामुळे भुजबळ फार्म पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदु ठरल्याचे दिसून आले. यावरून छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री (Guardian Minister) होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
भुजबळांचे चर्चांवर स्पष्टीकरण
पालकमंत्रीपदाच्या या चर्चांवर बोलतांना मंत्री छगन भुजबळ यांनी आज (रविवारी) माध्यमांशी बोलतांना भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “मी नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रीपदासाठी इच्छूक नाही. मला नाशिकसाठी जे काही करायचे आहे, ते मी करत आहे”, असे भुजबळ यांनी म्हटले. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत भुजबळांना रस नसल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा भुजबळांच्या नावाला ग्रीन सिग्नल?
दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून निर्माण झालेला नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आता सुटण्याची शक्यता बळावली आहे. कारण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या रूपाने भाजपच्या झोळीत कुंभमेळा मंत्रिपद (Kumbh Mela Minister) पडले आहे. त्यामुळे भाजप पालकमंत्रीपदावरील आपला दावा सोडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.





