नाशिक | Nashik
एकेकाळी नाशिक जिल्हा (Nashik District) हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत (Delhi) पकड असलेला काँग्रेस पक्ष मात्र आज पूर्णपणे खिळखिळा झालेला दिसून येत आहे. ओझर, पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) आणि त्र्यंबकेश्वर वगळता इतर आठही पालिकांमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवारही काँग्रेसला मिळू नये, ही मोठी शोकांतिका आहे.
जिल्ह्यातील सटाणा, येवला, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, चांदवड, मनमाड, सिन्नर, भगूर, ओझर, पिंपळगाव बसवंत या अकरा नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर पक्षांनी परिषदांवर शक्य तिथे युती किंवा शक्य नसेल तेथे स्वबळावर निवडणुका लढवण्याचे निश्चित केले आहे. मात्र, काँग्रेस पक्ष या निवडणूक प्रक्रियेत कुठेही प्रकाशझोतात दिसून आला नाही, केवळ तीन नगरपरिषदांमध्ये काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार (Candidate) दिले आहेत. बातही ओझर, पिंपळगाव बसवंत नगराध्यक्षपद हे राखीव असून त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव असलेल्या एकमेव जागेवर काँग्रेसने उमेदवार दिला असून संपूर्ण पॅनलही कोठेही उभे करता आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी काँग्रेसची पिछेहाट झालेली दिसून येत आहे.
आज काँग्रेस पक्षाचा जिल्ह्यातून विधानसभेत (Vidhansabha) तर एकही आमदार नाही. धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघातून डॉ. शोभा बच्छाव या खासदार आहेत. असे असतानादेखील खासदारकीचा पक्षाला कुठेही फायदा होताना दिसत नाही. निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान खासदारांचा सहभाग पाहिजे तसा कुठेही दिसून आलेला नाही. प्रदेश पदाधिकारी राजाराम पानगव्हाणे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, नव्यानेच निवड झालेले जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, रमेश कहांडोळे हे काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. एकेकाळी खासदार, चार आमदार, विधान परिषदेचा आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांवर हुकूमत गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाला नगराध्यक्षपदासह अनेक ठिकाणी नगरसेवक मिळू नये, ही मोठी शोकांतिका आहे. या स्थितीला काँग्रेस पक्षातील नेत्यांची गटबाजी आणि ओबीसीचे राजकारण कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.




