
नाशिक | Nashik
धुळे लोकसभा मतदारसंघाच्या (Dhule Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव (MP Shobha Bachhav) यांचा मोबाईल हॅक (Mobile Hacked) झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर भामट्यांनी कुरिअरच्या बहाण्याने लिंक पाठवून खासदारांचा फोन हॅक केला आणि त्यांच्या व्हॉट्सॲपवरून परिचितांकडे ६२ हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी सायबर पोलीसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
असा घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल त्यांच्या पीएकडे असताना एक संशयास्पद फोन (Phone) आला. ‘तुमचे कुरिअर आले आहे, पण पत्ता सापडत नाही, पाठवलेली लिंक तपासा’ असे सांगून हॅकरने पीएला जाळ्यात ओढले. यानंतर पीएने मेसेजमधील लिंक उघडताच काही वेळातच मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे गेला. यानंतर मोबाईल हॅक होताच भामट्यांनी खासदारांच्या व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना ‘Help Me’ आणि ‘माझ्या खात्यात ६२ हजार रुपये जमा करा, दोन तासांत परत करतो’ असे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
सायबर पोलिसांची तत्परता
दरम्यान, सायबर पोलिसांनी (Cyber Police) तातडीने सूत्रे हलवत खासदारांचा फोन पूर्ववत सुरक्षित केला आहे. काहींनी खासदारांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. डॉ. बच्छाव यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
नागरिकांना सावधगिरीचे आवाहन
कुरिअर, बँक किंवा कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका. पैशांची (Money) मागणी करणारे मेसेज आल्यास आधी संबंधित व्यक्तीशी खात्री करा, असे आवाहन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले आहे.




