नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फटका बसला असून, आम्ही सरकारकडे (Government) ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. मात्र, शेतकऱ्यांबाबत सरकारला काहीही देणंघेणं नाही. मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात. सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असून, सरकार पंचनामा नावाचा खेळ खेळत असून, क्रूरपणे वागत आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केला.
उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या (Congress) पदाधिकार्यांची विभागीय बैठक आज गुरुवार (दि.९) रोजी नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालय येथे आयोजित बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव महाराष्ट्राचे प्रभारी बी.एम. संदीप, उपाध्यक्ष गणेश पाटील आदी उपस्थित होते.
नाशिकमधील कायदा-सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त करत ९ महिन्यांत ४६ खून झाले असून, ४७ वा खून लोकशाहीचा झाला आहे, असा आरोप करून त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाशिकसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक शहराला ड्रग्ज रॅकेट आणि खूनाच्या घटनांनी गालबोट लागले आहे. गृहराज्यमंत्री बेताल आणि बेजबाबदार असून, बंदुकीचे परवाने वाटप करत आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून त्वरित हटवावे, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.
याशिवाय नाशिकच्या (Nashik) ‘रम्मी’पटूंना क्रीडा खाते दिले जाते, हे महाराष्ट्राच्या वैभवाला अशोभनीय आहे’ असे म्हणत त्यांनी मंत्र माणिकराव कोकाटेंना टोला लगावला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची आरक्षणाबाबतची नीती म्हणजे ‘तोडाफोडा राज्य करा’, अशी आहे. दोन्ही समाजांना न्याय देण्यासाठी आरक्षणावर गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षाही सपकाळ यांनी व्यक्त केली.
फडणवीस डमरू वाजवणारे गारुडी
सरकार शेतकऱ्यांशी क्रूरपणे वागत आहे. परवा जे पॅकेज जाहीर केले ती फसवणूक असून कोणतेही पॅकेज नाही.पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सळो की पळो करून सोडतील म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाईघाईत पॅकेज जाहीर केले. फडणवीस मुख्यमंत्री आहेत की डमरू वाजवणारे गारुडी आहेत?, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.
सावरकर हे गांधी हत्येच्या खटल्यातील आरोपी
महात्मा गांधींची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता. नथुराम गोडसे हा पहिला दहशतवादी होता.महात्मा गांधी यांचा खूनच झाला होता. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधींजींच्या खूनाच्या जागी वध असा शब्द टाकला. महाराष्ट्र ग्रंथातून हा शब्द हटवण्यात आला आहे. सावरकर हे गांधी हत्येच्या खटल्यातील आरोपी असल्याचे अधोरेखित करताना त्यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
मनसेबाबत स्पष्ट भूमिका
आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडीबाबत निर्णय राज्य पातळीवर न घेता स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत. मनसे आमच्या आघाडीचा भाग नसून, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला नव्या भिडूची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकला पालकमंत्रीही मिळेना
धार्मिक सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेले नाशिक ड्रग्जच्या रॅकेटमुळे बदनाम होत आहे. सिंहस्थ तोंडावर आला तरी अजुनही पालकमंत्री मिळालेला नाही. ही शोकांतिका असल्याचे सपकाळ म्हणाले.




