नाशिक | फारुक पठाण | Nashik
शुक्रवारी राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रारूप प्रभाग रचना (Ward Structure) जाहीर करण्यात आली. ही रचना जवळपास २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच असून, कुठलाही मोठा बदल करण्यात आला नसल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे. या रचनेवरून उघडपणे अद्याप कोणीही मत व्यक्त नसले तरी राजकारण मात्र तापायला सुरुवात झाली आहे.
महायुतीत (Mahayuti) अप्रत्यक्षरीत्या धुसफूस सुरू झाल्याचेही त्यांच्या स्थानिक नेत्यांच्या वक्तव्यांवरून दिसत आहे. तसेच बहुतांश पक्ष वरिष्ठांचा आदेश आल्यास स्वतंत्ररीत्या निवडणुकीत (Election) उतरण्याचा पवित्रा घेताना दिसत आहेत. शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Borste) यांनी वरिष्ठांचा आदेश आल्यास शिवसेना (Shivsena) महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे मैदानात उतरेल आणि शंभर टक्के भगवा फडकवेल, असा दावा केल्याने यंदा मनपा निवडणुकीत महायुतीचे भविष्य काय राहणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बोरस्ते म्हणाले की, प्रभाग रचना कशी आहे, कोणता भाग कुठे गेला याबाबत शिवसेना कधी चिंता करत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही २० टक्केराजकारण व ८० टक्के समाजकारण करत असतो. आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तर सध्या एक वेगळी जादू राज्यात आहे. त्याच्या कामांमुळे राज्यात पुन्हा सत्ता आली. नाशिकच्या जनतेने सगळ्यांना पडताळून पाहिले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वेगळा विश्वास व आदर आहे. त्याचा फायदा आम्हाला आगामी निवडणुकीत नक्की होणार आहे. ज्याप्रमाणे प्रारूप रचना जाहीर झाली आहे, त्यानुसार, शिवसेनेची संपूर्ण मंत्रणा सज्ज आहे. बूथ स्तरापासून शाखाप्रमुखापर्यंत आमच्या पदाधिकारी नेमणुका झालेल्या आहेत. त्यामुळे महायुती झाली तर उत्तमच आहे आणि प्रसंगी स्वतंत्र लढायचा आदेश आला तर त्यासाठी देखील आमची पूर्ण तयारी आहे.
बोरस्ते यांच्या या विधानानंतर मनपा निवडणुकीत महायुती एकत्रित लढवणार की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तसेच प्रारूप प्रभाग रचनेमुळे भाजप, तसेच महायुतीला फायदा होण्याची चिन्हे अहेत, असा अंदाज राजकीय समीक्षकांनी वर्तवला आहे. महापालिकेतील प्रभागांचे ज्या प्रकारे विभाजन केले गेले आहे, त्यात भाजप आणि महायुतीच्या आधीपासून असलेल्या ताकदीचा विचार करून या पक्षांना मतदारांच्या आवडीचा फायदा मिळेल, असा त्यांचा कयास आहे. मात्र दुसरीकडे, महायुती अखंड राहणार का, याबद्दल शंका आहे.
दरम्यान, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत महायुतीतील भाजपने महापालिकेतील १२२ पैकी ६६ जागा मिळवल्या होत्या. तर शिवसेना ३५, कांग्रेस ६, राष्ट्रवादी काँग्रेस ६, मनसे ५. अपक्ष ३ आणि आरपीआय (ए) १ असे संख्याबळ होते. यावेळच्या प्रभागरचनेनुसार प्रत्येक प्रभागात सुमारे ४८ हजार मतदार संख्या आहे. त्यामुळे राजकीय समीकरण अधिक स्पष्ट झाल्याचे मानण्यात येत आहे. या प्रारूप प्रभागरचनेवर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. त्यावर १२ सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेतली जाईल. अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोग ६ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करणार आहे. यानंतर मतदारयादी तपासणीस सुरुवात होईल. ती दीड महिन्यांच्या कालावधीत पार पडेल. या प्रक्रियेनंतर पुढील वर्षी जानेवारीत महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे मानले जात आहे. मात्र राजकारण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे.
प्रभाग रचनेवरून कोण काय म्हणाले?
वरिष्ठ नेते ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही उतरणार. स्वतंत्र लढण्याचे आदेश आले तर आमची पूर्ण तयारी आहे प्रत्येक प्रभागात बूथ स्तरावर भाजपने तयारी करून ठेवली आहे.
सुनील केदार, महानगरप्रमुख,भाजप
प्रारूप प्रभाग रचना समाधानकारक आहे, तसेच, महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण ताकदीने तयारी केली आहे. तरी वरिष्ठ ज्याप्रमाणे आदेश देतील, त्याप्रमाणे निर्णय होईल. स्वतंत्र लढायचे सांगितले तर स्वतंत्र लढणार तशी आमची तयारी आहे.
रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)
महाविकास आघाडीत आम्ही आहोतच. त्या पद्धतीने निवडणूक लढण्याची तयारी देखील आहे. तरी वरिष्ठ नेते जो आदेश देतील त्या दृष्टीने काम होईल. आम्ही महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पूर्ण तयारी करून ठेवलेली आहेत.
प्रथमेश गीते, महानगरप्रमुख (ठाकरे गट)
काँग्रेस पक्षाने देखील निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात आमची ताकद आहे. महाविकास आघाडी म्हणून लढायची तयारी आहे. तरी पक्षश्रेष्ठींकडून जो आदेश येईल त्यानुसार काम होणार असूनस्वतंत्र लढायची तयारी देखील काँग्रेस पक्षाची आहे.
आकाश छाजेड, शहराध्यक्ष, काँग्रेस
प्राप्त प्रभाग रचना समाधानकारक आहे. विकासकामांच्या जोरावर नाशिक महापालिकेत शंभर टक्के महायुतीची सत्ता येणार. प्रत्येक प्रभागात शिवसेनेची ताकद आहे.
बंटी तिदमे, महानगरप्रमुख, (शिवसेना शिंदे गट)




