मनमाड | प्रतिनिधी | Manmad
नगरपरिषदेच्या उद्या (मंगळवार) होणाऱ्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, आज (सोमवारी) मतदान केंद्र प्रतिनिधींना ईव्हीएम मशीनसह मतदानाचे इतर साहित्य वाटप करण्यात आले. ईव्हीएम मशीन आणि साहित्य मिळाल्यानंतर प्रतिनिधी आपापल्या मतदान केंद्रावर (Voting Station) रवाना झाले. उमेदवाराच्या निधनामुळे प्रभाग १० ची निवडणूक स्थगित करण्यात आली असून,उद्या नगराध्यपदासोबत नगरसेवकपदाच्या ३३ जागांपैकी ३१ जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर यांनी दिली.
नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक (Nagarparishad Election) होत असून, या निवडणुकीत नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यासाठी दोन अपक्ष आणि ६ राजकीय पक्षाचे असे ८ उमेदवार रिंगणात आहेत. तर १६ प्रभागांमधून ३३ नगरसेवकही निवडले जाणार आहे. त्यासाठी तब्बल ११६ उमदेवार मैदानात उतरले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, आज मतदानासाठी मतदान साहित्य,ईव्हीएम मशीन वाटप करण्यात आले.
१६ प्रभागांत ७२ मतदान केंद्र असून, यासाठी ७५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर २५० पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. मतदान सकाळी ७.३० ते सायं ५.३० वाजेपर्यत केले जाणार आहे. मतदारांनी जास्तीतजास्त मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शेषराव चौधरी यांनी केले.
प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवकपदाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन झाल्यामुळे या प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता ३३ पैकी ३१ नगरसेवकपदासाठी मतदान (Voting) होणार आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये मतदान केंद्र असणार आहे. मात्र, त्या भागातील मतदारांना फक्त नगराध्यपदासाठी असलेल्या उमेदवारांकरिता मतदान करावे लागणार आहे. प्रभाग १० वगळून इतर १ ते १५ प्रभागांमधील मतदारांना थेट नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकासाठी दोन असे तीन मतदान करावे लागणार आहे. प्रभाग १६ मधील मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकासाठी ३ असे ४ मतदान करण्याचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाने प्रचारासाठी एक दिवस वाढवून दिल्यामुळे या संधीचा फायदा घेत आज सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार रॅली काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
निवडणुकीत शिवसेना,भाजप,आरपीआय महायुतीनेसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवार राष्ट्रवादी स्वबळावर उतरले आहे. काँग्रेसने ९ जागांवर उमेदवार दिले असून, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी,वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पक्ष, यांच्यासह इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहे. बहुरंगी लढतीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेना,भाजप युतीचे योगेश पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवीण नाईक,अजित पवार गटाचे रविंद्र घोडेस्वार, शरद पवार राष्ट्रवादीचे शुभम चुनियान, वंचित बहुजन आघाडीचे नितीन जाधव, बहुजन समाज पक्षाचे प्रवीण पगारे, अपक्ष राजू निरभवणे, अपक्ष निमदेव हिरे, यांच्यासह दोन अपक्ष निवडणूक लढवित आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आमदार सुहास कांदे यांच्यासाठी ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगराध्यक्षसह महायुतीचे सर्व नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली आहे.




