नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) राजकीय समीकरणांना मोठा धक्का देणाऱ्या घडामोडीत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे दोन प्रमुख नेते भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करत आहेत. धुळे जिल्ह्यातील (Dhule District) धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) हे १ जुलै रोजी, तर नाशिकचे माजी आमदार डॉ. अपूर्वभाऊ हिरे २ जुलै रोजी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने आगामी स्थानिक व विधानसभा निवडणुकांसाठी आपली घडी अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट होत आहे.
धुळ्याचे दिवंगत मंत्री रोहिदास पाटील (Rohidas Patil) यांचे पुत्र व सध्या काँग्रेसचे आमदार असलेले कुणाल पाटील हे १ जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मागील तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेला हा परिवार आहे. कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश तीन पिढ्यांच्या काँग्रेस (Congress) पक्षावरील निष्ठेला तिलांजली देणारा निर्णय ठरणार आहे. कुणाल पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू होती. आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने धुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक बळाला मोठा धक्का बसणार आहे.
तसेच नाशिकचे माजी आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे (Dr.Apoorva Hiray) यांचा भाजप प्रवेश २ जुलै रोजी दुपारी १२ वाजता, मुंबईतील (Mumbai) भाजप प्रदेश कार्यालयात होणार आहे. यावेळी शेकडो समर्थकांसह पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह हिरे भाजप प्रवेश करणार आहेत.
विकासासाठी निर्णय?
आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागाचा समतोल विकास यातून साधण्याचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. कुणाल पाटील आणि डॉ. अपूर्व हिरे या दोन नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपची उत्तर महाराष्ट्रावरील पकड आणखी मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.




