नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shinde Shivsena) जिल्हास्तरावरील संघटनात्मक कमकुवतपणा, गटबाजी आणि नियोजनशून्यता यामुळे पक्षाची वाढ खुंटली आहे. पक्षश्रेष्ठींवर कोणतीही नाराजी नाही, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र जिल्हास्तरावर योग्य नियोजन आणि संघटनशक्तीचा अभाव आहे, असा शब्दांत माजी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यात पक्षाचे दोन आमदार (MLA) असताना उर्वरित १३ विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्ष यंत्रणा उभी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी कुशल नेतृत्व शोधून त्यांना जबाबदार्यांचे वाटप करणे, गटबाजी रोखणे,शिस्तबद्ध कार्यपद्धती राबवणे गरजेचे आहे. मात्र, त्या दृष्टीने काही ठोस प्रयत्न होतांना दिसत नाहीत. त्यामुळेच नाराज असल्याचे हेमंत गोडसे म्हणाले. तसेच शिवसेनेकडे आज इनकमिंग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक नवे चेहरे पक्षात प्रवेश करत आहेत. मात्र अंतर्गत गटबाजीचे ‘लोन’ वाढत गेले, तर ते पक्षासाठी घातक ठरू शकते. आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बाबी गंभीरपणे घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “माझा रोख पक्ष संघटन मजबूत व्हावे, यासाठी आहे. जिल्ह्याची (District) जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे आहे, त्यांनी हे काम प्राधान्याने करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होतांना दिसत नसल्याने नाराजी वाटते”, असे म्हणत त्यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे नाव न घेता उल्लेख केला आहे. तसेच मी आज खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांची वैयक्तिक कामासाठी भेट घेणार असून, या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे,” गोडसे यांनी सांगितले.
तसेच हेमंत गोडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) शिस्तबद्ध कार्यसंस्कृतीचे कौतुक करताना म्हटले की, “भाजपची संघटन बांधणी उत्कृष्ट आहे. त्यांच्याकडे पक्ष शिस्त चांगली आहे,” असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप प्रवेशाचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





