नाशिक | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज (मंगळवारी)कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी छगन भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह पन्नास मान्यवर उपस्थित होते.
अशातच आता भुजबळ यांच्या मंत्रीपदानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला चौथे मंत्रिपद मिळाले आहे. याआधी शिवसेना शिंदे गटाचे मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे (Dada Bhuse) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना मंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर आता यामध्ये छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाची भर पडली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष दावा करत आहेत.नाशिकमध्ये आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद महत्वाचे मानले जात आहे. नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रीपदासाठी भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि शिवसेनेचे (शिंदे गट) दादा भुसे यांच्यात रस्सीखेच सुरु होती. त्यातच आता भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने त्यांचे देखील नाव नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे आता आगामी काळात नाशिकचे पालकत्व महाजन, भुसे आणि भुजबळ यांच्यापैकी कुणाकडे जाते हे स्पष्ट होणार आहे. मात्र, तिन्ही पक्ष नाशिकसाठी आपला दावा मजबूत करत आहेत.
फडणवीसांना महाजनच हवे पालकमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदी (Guardian Minister) गिरीश महाजनच हवे आहेत. कारण महाजनांची ओळख मुख्यमंत्र्यांचे विश्वासू साथीदार म्हणून आहे. त्यांनी अनेकवेळा संकटमोचकाची भूमिका पार पाडली आहे. नाशिकमधील मागील कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) वेळी देखील गिरीश महाजन पालकमंत्री होते. त्यामुळे भाजप पुन्हा गिरीश महाजनांकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.
शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही पालकमंत्रीपदावर दावा
फडणवीस सरकारने १८ जानेवारी २०२५ रोजी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यावर शिंदेंची शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या निर्णयास स्थगिती देण्यात आली होती. शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे यांनी दावा केला होता. परंतु, अद्यापही नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. त्यातच आता छगन भुजबळ यांना देखील मंत्रीपद मिळाल्याने राष्ट्रवादीकडूनही नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा केला जाऊ शकतो.