नाशिक | प्रतिनिधी | Nashik
घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपाच्याच (BJP) नाशिक महानगर कार्यकारिणीवर (BJP Executive of Nashik) घराणेशाहीची छाप दिसत आहे. प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबातीलच गोतावळा जमवण्यात आला आहे. कार्यकारिणीत सामाजिक समतोल राखण्यात आल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केला असला तरी या कार्यकारिणीत ठाकरे गटातून आलेल्या सुनील बागूल, बबनराव घोलपांना स्थान दिले आहे. मात्र शिवेसनेतून आलेल्या सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना डावलण्यात आल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
महापालिकेवर (NMC) एक हाती सत्ता आणण्यासाठी भाजपकडून कार्यकारिणीत पावणे दोनशे जणांची जंबो कार्यकारणी जाहीर केली आहे. १० उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, १० चिटणीस यांच्यासह भाजपप्रणीत ३६ आघाड्यांच्या प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल ९८ सदस्य आणि १२ जणांचा विशेष निमंत्रितांचा यादीत समावेश आहे. पक्षाशी प्रामाणिकपणे एकनिष्ठ चेहरे कार्यकारिणीत असले तरी त्यांना बढतीच दिसत नाही.
कार्यकारिणीत सुनील बागूल (Sunil Bagul) व माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांना विशेष निमंत्रितांच्या यादीत स्थान देण्यात आले. मात्र, गणेश गितेंना कार्यकारिणीपासून लांब ठेवण्यात आले आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, माजी महापौर सतीश कुलकर्णी, विजय साने, प्रदीप पेशकार, माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गिरीश पालवे, महेश हिरे, माजी आमदार निशिगंधा मोगल यांनाही आता थांबण्याचा सल्ला दिलेला दिसत आहे.
दरम्यान, प्रदेश भाजप नेतृत्वाने (BJP leadership) ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यकारिणी तयार केली आहे. यात सर्व घटकांना समावून घेतले आहे. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावेल. असे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले आहे.




