नाशिक | Nashik
राज्य सरकारकडून (State Government) काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर कुठला मंत्री कुठे ध्वजारोहण (Flag Hoisting) करणार याची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) ध्वजारोहण करणार आहेत. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
भुजबळ यांना स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्याचा (Gondiya District) ध्वजारोहणाचा मान मिळाला होता. पंरतु, त्यांनी गोंदियाला जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. तसेच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार असतानाही, गोंदियाला ध्वजारोहणाला का जायचं? असा सवाल उपस्थित केला होता. यावरून महायुतीमध्ये नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा सुरु झाली होती.
त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये (Nashik) ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे. भुजबळ यांच्या हस्ते दि.१५ ऑगस्ट रोजी नाशिकमधील मुंबई नाका परिसरात असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात ध्वजारोहण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी गोंदियाला ध्वजारोहणास जाण्यासाठी नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
गोंदियाची जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangal prabhat Lodha) यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात लोढा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण (Flag Hoisting) होणार आहे.
भुजबळांची पालकमंत्रीपदासाठी फिल्डिंग
महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची नियुक्ती करण्यात आली होती. पंरतु, यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्य उफाळून आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ महाजन यांची नियुक्ती मागे घेतली. सध्या नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. त्यानंतर आता यात राष्ट्रवादीने देखील उडी घेतल्याने मंत्री छगन भुजबळ हे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्रीपदासाठी फिल्डिंग लावल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.





