नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नगरपरिषद व नगरपालिकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले असून, भाजप हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचे प्रतिपादन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी केले. हे निकाल कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित असून, काही ठिकाणी अंदाज चुकले असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत जनता आपल्यालाच कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाजन बोलत होते.
निकालांविषयी त्यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वरचा (Trimbakeshwar) निकाल अनपेक्षित ठरला. तेथे शिंदे शिवसेनेचा म्हणजेच महायुतीतील मित्रपक्षांचा उमेदवार निवडून आला. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आमचा उमेदवार विजयी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. तरी उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातील एकूण निकाल समाधानकारक आहे. महाविकास आघाडीवर टीका करताना महाजन म्हणाले की, या निवडणुकीत पवार साहेब आणि उबाठा गटाचे प्रमुख घराबाहेरही पडले नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे मतदार त्यांना योग्य धडा शिकवत आहेत.
तर आगामी महापालिका निवडणुकीत (Nashik NMC Election) याहूनही वाईट परिस्थिती महायुतीतील जागा वाटपाबाबत बोलताना महाजन म्हणाले की, गेल्या तीन-चार दिवसांपासून शिवसेने (शिंदे गट) सोबत चर्चा सुरू आहे. दादा भुसे व समीर भुजबळ यांच्याशी चर्चा झाली असून, येत्या एक दोन दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उर्वरित ४० जागांमध्ये अन्य घटक पक्षांचा समावेश असून सुवर्णमध्य काढला जाईल. आम्ही महायुतीतच महापालिका निवडणुका लढवणार आहोत,असे महाजन यांनी म्हटले.
तसेच युती (Alliance) झाल्यास बहसंख्य जागा भाजपच्याच येतील, असा दावा करत महाजन म्हणाले की, सध्या ७८ ते ८० नगरसेवक भाजपचे आहेत. महायुतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियादेखील सहभागी होईल. आम्ही सगळेच धुरंदर आहोत. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला असून महापालिका निवडणुकीत परिस्थिती आणखी खराब होईल, असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.
गर्दीही जमेल, पण मतदान होणार नाही
मनसे-शिवसेना (उबाठा) युतीबाबत बोलताना महाजन म्हणाले, त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. मराठीचा मुद्दा उगाच काढला जातो, मात्र मराठी माणसाचा त्यांच्यावरचा विश्वास संपलेला आहे. सभा होतील, गर्दीही जमेल, पण मतदान होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
बबलू शेलार यांचा भाजप प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे बबलू शेलार यांनी सोमवारी समर्थकांसह भाजपत प्रवेश केला. आ. देवयानी फरांदे, राहुल ढिकले, शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्वागत केले. यावेळी शेलारांसह चंद्रमोहन शेलार व सहकाऱ्यांनीही प्रवेश केला. शेलार यांच्या घराण्यात भाजपचा प्रवेश झाल्याने भविष्यात गजानन शेलार यांच्या बालेकिल्ल्यातही राजकीय घडामोडी वेग घेतील अशी शक्यता आहे.
मी राष्ट्रवादीतच
तरुण रक्त आहे, त्यामुळे त्याला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याला योग्य वाटले म्हणून त्याने ते केले. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहे व यापुढेही राहणारच. सध्या बाहेरगावी असल्याने जास्त काही बोलू शकत नाही. दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन माझे मत मांडतो.
गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष




