नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) नाशिक शहरातील पक्षाचे ताकदवान नेते आणि खासदार संजय राऊतांचे राईट हँड म्हणून ओळख असलेले सुधाकर बडगुजर यांची पक्षविरोधी वक्तव्य केल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर बडगुजर हे आज (मंगळवार) भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे ठाकरेंच्या शिवसेनेत असताना भाजपकडून त्यांच्यावर १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत एका पार्टीत एकत्र डान्स करतानाचा व्हिडिओ आणि फोटो समोर आला होता. त्यावेळी भाजप मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधानसभेत हे फोटो दाखवत सभागृह आवाज उठवला होता.
यानंतर लगेचच तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल,अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यावर त्यांच्यावर आरोप करणाऱ्या मंत्री नितेश राणेंची भाषाच बदलली असून, त्यांनी बडगुजरांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले आहे. ते आज (मंगळवारी) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना मंत्री नितेश राणे म्हणाले की, “हिंदुत्त्वाचा धागा घेऊन आमच्यासोबत कोणीही येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करणार. बडगुजर आता १०० टक्के भगवाधारी झाले आहेत. त्यामुळे ते आमच्यासोबत येणार असतील त्यांचे स्वागतच आहे. बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरु आहे. त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी आम्ही काढलेल्या सकल हिंदुत्व मोर्चात आघाडीवर होता. त्यामुळे आता ते येत असतील तर आमची काहीच हरकत नाही, असे त्यांनी म्हटले.
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे काय म्हणाले?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आज सकाळी माध्यम प्रतिनिधींनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारणा केली. यावेळी ते म्हणाले की,” सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांच्याशी सल्लामसलत एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. परिणामी नाशिकमध्ये बडगुजर यांच्याविषयी विरोधाची भावना आहे, असे त्यांनी म्हटले होते.




