नाशिक | Nashik
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pandey) यतीन वाघ, काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे, माजी आमदार नितीन भोसले यांच्यासह मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी पुत्र अमोल पाटील, पत्नी लता पाटील आणि माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांच्यासह भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमध्ये विरोधी पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. यानंतर मनसेतून दिनकर पाटील आणि शिवसेना ठाकरे गटातून पांडे आणि वाघ यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : अखेर नाट्यमय घडामोडी अन् विरोधानंतर माजी आमदार भोसले, पांडे, वाघ, पाटील, खैरेंचा भाजपमध्ये प्रवेश
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत “पक्षविरोधी कारवायांबद्दल विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे! जय महाराष्ट्र!, असे म्हटले आहे. तर दिनकर पाटील यांनी पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांचे निलंबन करण्यात आले असून, त्यांचा पक्षासोबत कुठलाही संबध असणार नाही,असे मनसेकडून एक पत्रक प्रसिद्ध करत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे आता या दोन्ही नेत्यांचे आपल्या पक्षाकडे परत जाण्याचे दोर कापले गेले आहेत.
दरम्यान, नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांनी माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह यतीन वाघ, काँग्रेसचे (Congress) माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध केला. त्यामुळे भाजप कार्यालयाबाहेर पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर आमदार फरांदे यांनी पक्षप्रवेशाला अनुपस्थिति दर्शवत आपली नाराजी व्यक्त केली. यामुळे नाशिक भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे बघायला मिळाले.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : आमदार फरांदेंचा पांडे, वाघ, खैरेंच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध; भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर




