नाशिक | Nashik
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नाशकात (Nashik) ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह यतीन वाघ, माजी नगरसेवक संजय चव्हाण आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे हे आज (गुरुवारी) भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. यानंतर मनसेला (MNS) देखील मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेवक दिनकर पाटील (Dinkar Patil) त्यांचा मुलगा अमोल पाटील, माजी नगरसेविका लता पाटील आणि माजी नगरसेवक रवींद्र धिवरे हे देखील भाजपमध्ये थोड्याच वेळात पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. काल (बुधवारी) मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना युतीची घोषणा होताच पाटील यांनी मनसे कार्यालयात जल्लोष साजरा केला होता. मात्र आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
विकासासाठी भाजपमध्ये
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना ‘प्रभागाचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये चाललो आहोत’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दिनकर पाटील पूर्वी भाजपमध्ये होते. परंतु, विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी निवडणूक देखील लढवली होती. मात्र,भाजपच्या सीमा हिरे यांनी त्यांचा पराभव केला होता. यानंतर आज ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
काल विजयी जल्लोष आणि आज भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (बुधवारी) मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. यामुळे संपूर्ण राज्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. नाशिकमध्ये देखील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला होता.यामध्ये मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील आणि शिवसेनचे (ठाकरे गट) माजी महापौर विनायक पांडे देखील उपस्थित होते. मात्र, आज (गुरुवारी) या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार फरांदे यांचा पक्षप्रवेशाला विरोध
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह यतीन वाघ,माजी नगरसेवक संजय चव्हाण आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध दर्शविला आहे. तसेच त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे. तर फरांदे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत त्यामध्ये “प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही”, असं म्हटले आहे. यामुळे नाशिकमधील भाजपची अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.
विनायक पांडे नेमकं काय म्हणाले?
माध्यमांशी बोलतांना विनायक पांडे म्हणाले की, “मागच्या निवडणुकीत तिकिटाच्या वेळी माझ्या मुलाचे तिकीट कापले. आता पुन्हा मुलाच्या उमेदवारीची मागणी केली होती. पंरतु, त्यांच्याकडून सूनबाईला निवडणुकीत उतरविण्यास सांगण्यात आले. त्यादृष्टीने आम्ही सूनबाईला निवडणुकीत उतरवले. आता आम्ही मनसे आणि शिवसेनेचा सुफडा साफ करणार आहोत. संजय राऊत यांच्यासोबत मी फोनवर चर्चा केली, पण त्यांनी उमेदवारीबाबत काही ठोस सांगितले नाही. तरुण पिढीला आता पुढे नाही आणायचे तर मग कधी? माझी पक्षातील कोणावरही नाराजी नाही. मात्र, आज आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत”, असे त्यांनी म्हटले होते.




