नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) हे आज (बुधवारी) नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारार्थ ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी काळाराम मंदिरात आरती करून दर्शन घेत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, “नाशिककरांनी शिवसेनेला नेहमी भरभरून दिले आहे. गेल्या वेळी शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढत आहेत. त्यामुळे आम्हाला नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळेल. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा (Shivsena) स्ट्राईक रेट चांगला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पाच नगर परिषदांवर शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान झाले. आताही नाशिक महापालिकेवर (Nashik NMC) शिवसेनेचा भगवा फडकेल,” असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले, नाशिक महापालिकेत शिवसेनेची सत्ता शंभर टक्के येईल. त्यामुळे शिवसेनेचाच महापौर या महापालिकेत बसेल. शिवसेना नेहमी विकासाचे राजकारण करत आली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात जास्त काम झाले आणि सर्वाधिक निधी मिळाला. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत नवीन योजना आणण्याचे काम झाले. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणवर निधी आणण्याचे काम मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून झाले आहे. आगामी काळात नाशिकमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर देखील मोठी कामे एकनाथ शिंदे यांच्या खात्याच्या माध्यमातून होतील, असेही खासदार शिंदे यांनी म्हटले.
तसेच भाजपने (BJP) अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत (Congress) तर अकोटमध्ये एमआयएमबरोबर केलेल्या युतीवर बोलतांना श्रीकांत शिंदे म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा काँग्रेससोबत युतीला विरोध होता म्हणून त्यांनी शिवसेनेत उठाव केला. भाजपने घेतलेल्या या निर्णयाबाबत त्यांचे नेते उत्तर देतील. त्यावर मी काही बोलू शकत नाही. पंरतु, भाजपने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे, असेही त्यांनी सांगितले.




