नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बहुजन समाजाचे हित साधत असताना आपण एनडीएमध्ये (NDA) सामील होण्याचा निर्णय अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आम्ही सर्व नेत्यांनी सर्वानुमते घेतला होता. त्यावेळी आमच्यावर टीका झाल्या. मात्र विधानसभेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवली व आमचे ४१ आमदार (MLA) निवडून आले. आताही आगामी निवडणुकादेखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहे. तरीही स्थानिक पातळीवरील परिस्थिती व नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkre) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या (Local Body Election) दृष्टीने प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्याचा दौरा करीत आहे. राज्यात ठिकठिकाणी आमचे जोरदार स्वागत होत आहे. आगामी निवडणुका देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहे, तरीही स्थानिक पातळीवरील परिस्थिती व नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही विषय वेगळे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली भूमिका राजकीय आहे. २०१४ लाच विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) निकाल लागल्यावर आम्ही भाजपसोबत जाण्याची घोषणा केली होती. पक्षाची मूळ विचारधारा घेऊन आम्ही महायुतीसोबत गेलो असून, पुढेही कायम राहणार आहे.
दरम्यान, यावेळी ज्येष्ठ नेते, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे, आ. सरोज अहिरे, आ. पंकज भुजबळ, माजी खा. समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ज्येष्ठ नेते विष्णूपंत म्हैसधुणे, संजय खैरनार आदी उपस्थित होते.
मनपा निवडणूक जबाबदारी मंत्री भुजबळांवर
यावेळी तटकरे यांनी छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांचे विशेष कौतूक केले. ना. भुजबळांना पक्षाने विनंती करुन नाशिक शहरात जास्त लक्ष देण्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे समीर भुजबळ हे उत्तम शोमॅन असल्याचे सांगत १९९९ साली पक्षाच्या स्थापनेच्या कार्यक्रमाचे नियोजन देखील त्यांनी केले होते, असे सांगत आगामी मनपा निवडणुकीची जबाबदारी दोन्ही भुजबळांवर पक्षाने दिल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिले
पालकमंत्र्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार
नाशिक व रायगडचे (Nashik and Raigad) पालकमंत्री पद थांबविले आहे. पालकमंत्री कोणाला करायचे याचा संपूर्ण निर्णय व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा आहे. ते लवकरच होईल असे तटकरे यांनी सांगितले.
कुटुंबियांनी बरोबर राहणे चांगले – भुजबळ
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना सोडली होती, ती कोणत्या कारणांनी सोडली होती व आज उद्धव ठाकरे व राज ठाकरे सोबत आले तर त्या कारणांची चर्चा झाली का? त्याच्यावर काय निर्णय झाला हे पाहणे महत्त्वाचे आहे, तरीही ठाकरे कुटुंब असो की पवार कुटुंब, कुटुंबियांनी बरोबर राहणे हे कधीही चांगले असते, अशी टिपण्णी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यावर केली.




