नाशिक | Nashik
जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव महापालिकेसाठी (Nashik and Malegaon NMC) १५ जानेवारीला मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये युती करण्यासाठी बैठका सुरु आहेत. यात नाशिक महापालिकेसाठी दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे (Girish Mahajan and Dada Bhuse) यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत दोघांत नाशिक महापालिका निवडणुकीच्या जागावाटप संदर्भात चर्चा झाली.
यानंतर आज (सोमवारी) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (NCP Ajit Pawar) मंत्री नरहरी झिरवाळ,माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांना बैठकीसाठी हॉटेल रेडीसन ब्लू येथे विनंती केली असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे भाजपला (BJP) नाशिकमध्ये राष्ट्रवादी नको आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) मंत्री गिरीश महाजन गाडीत बसलेले असताना त्यांना साहेब चर्चेसाठी ५ मिनटं तरी वेळ द्या, अशी विनवणी करतांना बघायला मिळत आहेत. मात्र, मंत्री गिरीश महाजन यावर कोणतेही उत्तर न देता थेट गाडीत बसून निघून जाताना दिसत आहेत. यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उलटसुलट उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन निघून गेल्यानंतरही मंत्री नरहरी झिरवाळ आमदार हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज अहिरे माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे हॉटेल रेडीसन ब्लू येथे उपस्थित होते.
दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी जवळपास १२०० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यातच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुक स्वबळावर लढवावी अशी अपेक्षा वरिष्ठ नेतृत्वाकडे व्यक्त केली आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी युती करुनच लढावे, अशा सूचना दिल्याचे बोलले जात आहे. त्याअनुषंगाने मंत्री महाजन आणि भुसे यांच्यात बैठक देखील झाली आहे. पंरतु, आज महाजनांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनवणी करून देखील त्यांनी त्याला प्रतिसाद न दिल्याने भाजपला फक्त शिवसेनेसोबत युती करायची आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.




