नाशिक | विजय गिते | Nashik
महानगरपालिकेच्या निवडणुकीचा (Mahapalika Election) प्रचाराचा ज्वर आता हळूहळू वाढू लागला आहे. या निवडणुकीमध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधींचा मुलगा, मुलगी, पत्नी, सून, पुतण्या, भावजई एवढेच नव्हे तर नातू निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांचा निवडणूक रिंगणातील पहिलाच प्रसंग असणार आहे. जवळपास दोन डझन नव नेतृत्व जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. या नव नेतृत्वाचा राजकारणातील श्री गणेशा कसा होतो? याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नव नेतृत्वाचा कस लागणार असून नाशिककर कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक तसेच विविध पक्षांतील महत्त्वाच्या पदांवर राहिलेल्या नेत्यांचे जवळचे नातेवाईक थेट मैदानात उतरले आहेत. यामध्ये माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pande) यांची सून अदिती, त्यांचे बंधू व भावजयी स्व. चंद्रकांत पांडे व कल्पना पांडे यांची कन्या शिवानी, माजी महापौर सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या, माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीच प्रेम व पुतण्या अमोल हे त्यातील प्रमुख चेहरे आहेत.
हे देखील वाचा : Nashik Politics : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये ‘या’ तारखेला संयुक्त सभा; २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर
त्याचप्रमाणे माजी उपमहापौर, ज्येष्ठ नगरसेवक, आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक विविध पक्षांकडून उमेदवारी करत असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या सर्वच प्रमुख पक्षांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. राज घराण्यातील या नवख्या उमेदवारांसाठी ही निवडणूक म्हणजे राजकारणातील ‘श्रीगणेशा’ ठरणार आहे. या नव्या नेतृत्वाला नाशिककर कशी व किती संधी देतात, हे निकालातून स्पष्ट होणार आहे. माजी महापौर यतीन वाघ यांची पत्नी हितेश वाघ, माजी उपमहापौर भिकुबाई बागुल यांचे नातू मनीष बागुल, माजी उपमहापौर सलीम अब्बास यांची पुतणी बुशरा शेख, माजी उपमहापौर गुलाम ताहीर यांचा मुलगा तल्हा शेख निवडणुकीला प्रथम सामोरे जात आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी (Laxman Savaji) यांची कन्या कलाकार नुपूर, जेष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षदा बडगुजर यांचे पुत्र दीपक, माजी नगरसेवक विजय साने यांचे पुत्र अजिंक्य, ज्येष्ठ माजी नगरसेवक गजानन शेलार यांचे पुतणे बबलू, माजी नगरसेवक दिनकर पाटील व माजी नगरसेविका लता पाटील यांचे पुत्र अमोल, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांची पत्नी दिपाली, माजी आमदार नितीन भोसले यांची भावजयी रश्मी, माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे चिरंजीव रितेश, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांची पत्नी सीमा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांचे बंधू अंबादास, शिवसेनेच्या नेत्या माजी नगरसेविका स्व. सत्यभामा गाडेकर यांचे चिरंजीव योगेश, माजी नगरसेवक शीर अदिना, याबरोबरच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक स्वप्निल नन्नावरे यांची पत्नी रूपाली हे प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहेत.
हे देखील वाचा : Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कुणाच्या तोफा धडाडणार?
दरम्यान, हे सर्व नवखे उमेदवार (Candidate) आहेत. मात्र, आई-वडील, काका, आजी यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळालेले आहे. अशा नव उमेदवारांना नाशिककर (Nashik) कसे आणि कोणा कोणाला स्वीकारतात व त्यांच्या ओंजळीत मतदान रुपी किती भरभरून मताचे दान करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





