चांदवड | प्रतिनिधी | Chandwad
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक (Nagarparishad Election) २०२५ च्या पारदर्शक व सुरळीत पार पडण्यासाठी आज (सोमवारी) मतदान (Voting) पथके अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रवाना करण्यात आली. एकूण २२ मतदान केंद्राकरिता ११० अधिकारी–कर्मचारी नियुक्त असून त्यात २२ केंद्राध्यक्ष, ६६ मतदान अधिकारी आणि २२ सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. याशिवाय २० राखीव कर्मचारी व ३ क्षेत्रीय अधिकारी तैनात करून प्रशासनाने निवडणूक यंत्रणा अधिक बळकट केली आहे.
सुरक्षा व्यवस्थेस विशेष महत्त्व देत प्रत्येक केंद्रावर १ पोलीस कर्मचारी नियुक्त असून केंद्र परिसराच्या बंदोबस्तासाठी ४ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच क्षेत्र गस्ती पथकात ३ पोलीस अधिकारी व प्रत्येकी ६ कर्मचारी अशा मजबुत सुरक्षा रचनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या मतदानाचे खास आकर्षण म्हणजे मतदान केंद्र क्रमांक ९ व ३ पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामविकास संस्था (होळकर शाळा), चांदवड येथे पूर्णपणे महिला कर्मचारी संचलित “सखी मतदान केंद्र” उभारण्यात आले आहे.
महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारे हे केंद्र मतदारांचे लक्ष वेधून घेणार आहे. मतदान पथकांना आज सर्वांगीण प्रशिक्षण देऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. मतदान सुरू होण्यापूर्वी सकाळी ६.३० ते ६.४५ या वेळेत अभिरूप मतदान घेण्यात येणार असून यासाठी उमेदवारांनी आपल्या प्रतिनिधींना वेळेवर उपस्थित ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, प्रभाग क्र. ३ ‘अ’ करिता निवडणूक प्रक्रिया सध्या स्थगित असून नव्या कार्यक्रमानुसार ती पुढे नेली जाणार असल्याची माहिती निवेदन निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.




