नाशिक | शैलेंद्र तनपुरे – सल्लागार संपादक
हिंदुत्ववादी कार्यकर्ते गजू घोडके यांच्या घरात शिरून मारहाण करणे व जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल व महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या प्रवेशास स्थगिती देऊन भारतीय जनता पक्षाने जनाची नाही पण मनाची थोडी तरी राखली, असे म्हणता येईल. (जनांना तर त्यांनी केव्हाच फाटचावर मारले आहेच) पोलिसांच्या दप्तरी परागंदा अशी नोंद असलेल्या या दोघांसह त्यांचे इतर साथीदार गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते. तशी जाहीर घोषणाही केली गेली होती. त्यांच्यासोबत आणखीही इतर गणंगांचा प्रवेश सोहळा होता. परंतु खा. संजय राऊत यांच्या एका द्विटने सगळा माहौलच बदलून टाकला आणि बागुल कंपनीचे शुद्धीकरण लांबणीवर पडले. याचा अर्थ आज ना उद्या बागुल कंपनी भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छ होऊन बाहेर पडणार हे निश्चित. गावावरून ओवाळून टाकलेल्या तसेच इतर पक्षातील गणंगांना पक्षात घेताना लोक काय म्हणतील, पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना काय वाटेल, नेत्यांचे काय म्हणणे आहे, याच्याशी भाजपच्या काही नेत्यांना आता काहीच घेणे राहिलेले नाही. तसे असते तर किमान याबाबत स्थानिकांशी चर्चा तरी केली असती. ‘पार्टी विथ डिफरन्स’ या नैतिकतेचा एकेकाळी टेंभा मिरवणारी हीच का ती भारतीय जनता पार्टी असा प्रश्न भाजपचीच जुनी मंडळी विचारत आहेत. हल्ली मोदींचे हात बळकट करण्यासाठी हे सारे चालले असल्याचा निलाजरा दावा सोशल मीडियावर केला जातो.
वाजपेयींचे सरकार केवळ एका मताने पडले होते, त्यामुळे एकेक माणूस महत्त्वाचा आहे, असा अजब तर्कही काही ‘तत्त्वचिंतक’ मांडताना दिसतात. या असल्या बाजारबुणग्या गप्पांमुळे हाडाची कार्ड करून पक्ष वाढवलेली मंडळी मात्र, ‘लवकर उचलरे रामा’, असा धावा करताना दिसतात. ज्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झालेली आहे, अशांना प्राधान्याने प्रवेश देण्याची जणू नवी मार्गदर्शक तत्त्वेच भाजपने जारी केलेली दिसतात. सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावेळी स्थानिक आमदारासह संपूर्ण राज्यातील भाजपच्या हितचिंतकांकडून ज्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या त्याला हिंगही लावून न विचारता आता त्याही पुढे जाऊन संकटमोचकांनी पूर्वीचे बरे होते असे वाटावे अशांना पायघड्या घातल्याने भाजपने आता नीतिमत्तेच्या सगळ्याच सीमा पार केल्याचे दिसते. पक्ष विस्ताराच्या नावाखाली इतर पक्षातील निवडक गणंगांना बरोबर घेण्यामागे पक्षाची नेमकी काय भूमिका आहे, ते कळायला मार्ग नाही. कारण नाशिकमध्ये तरी भाजप सत्तेत होता आणि गेल्या दहा वर्षांपासून शहरातच तीन आमदारही आहेत. अशावेळी दिसेल त्याला कळपात ओढण्याची निकड नेमकी काय हे समजत नाही.
एकतर स्थानिक आमदार महापालिका पुन्हा जिंकून देण्यात सक्षम नाही असे तर यातून त्यांना भासवयाचे नाही ना? एकीकडे भाजप हा जगातील सर्वात बलाढ्य पक्ष असल्याच्या डिंग्या मारायच्या आणि गल्लीबोळातही ज्यांच्याविषयी चार चांगले शब्द बोलले जात नाही अशांना मात्र पक्षात घेण्यासाठी स्वपक्षीयांनाही झिडकारायचे हे कशाचे लक्षण
भाजपने आता सारी लाजलज्जा सोडली असल्याची सात्विक संतापाची प्रतिकि या हिंदुत्ववादी कार्यकर्ते उघडपणे व्यक्त करू लागले आहेत. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हे खरे असले तरी सदोदित सर्वच माणसांना मूर्ख समजणेही चुकीचे असते. सुधाकर बडगुजर, अपूर्व हिरे, कन्नू ताजणे, सुनील बागुल, मामा राजवाडे, अजय बागुल, बाळासाहेब पाठक यासारख्यांना प्रवेश देताना त्यांची
संकटमोचक गिरीश महाजन यांनी नक्कीच पाहिली असेल. त्यामुळेच महाजन हे सध्या भाजपचे की अशा गुन्ह्यांची पदके मिरवणाऱ्यांचे संकटमोचक आहेत, अशा प्रश्न पडला. याशिवाय रम्मी राजपूत, व्यंकटेश मोरे आदींची आधीपासून खोगीरभरती केलेली आहेच. त्यात आता वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी केलेल्यांचा समावेश करून पक्षाला एका नव्या उंचीवर नेल्याचे समाधान महाजनादी कंपनीला असेल. बागुल व मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी प्रवेशाचा कार्यक्रम रद्द झाला. भाजप एवढा दुबळा झाला आहे का, की त्यांना अशा प्रकरणाच्या माध्यमातून या लोकांना पक्षात आणावे लागते आहे.
शिक्षकांच्या नावावर कोट्यवधीची बोगस कर्जे काढून फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार अपूर्व हिरेंसह त्यांचे वडील माजी मंत्री प्रशांत हिरे अन् बंधू अद्वय हिरे यांच्यावर मालेगाव येथे गुन्हा दाखल झाला अन् दोन दिवसातच पैकी अपूर्व यांना पक्षाने पावन करून घेतले. दोन्ही प्रकरणात आधी गुन्हे अन् नंतर भाजपच्या धुलाई मशीनमधून काढणे ही प्रक्रिया झाली. ऐनवेळी बागुल कंपनीचे प्रवेश थांबवून भाजपने अद्याप थोडीफार शिल्लक असल्याचा देखावा उभा केला असला तरी आज ना उद्या या सगळ्यांचे प्रवेश वाजतगाजत होणार यात शंका नाही. हे प्रवेश होतील तेव्हा सोबत अजय बागुल, बाळासाहेब पाठक यांच्यासह आणखी काही जणांना पावन केले जाऊ शकते. पैकी पाठक हे नाशिकमधील रिक्षाचालक मालकांच्या संघटनेचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या ‘कौशल्या’ बद्दल वेगळे काय सांगणार! अजय बागुल हे मध्यंतरी काहीकाळ तडीपार होते. तेव्हा ते शिवसेनेत होते म्हणून त्यांच्यावर कारवाईचा डाव टाकला गेल्याबद्दल बोलले गेले. आताही बागुल व राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांना भेटून हाच आरोप केला. असे गुन्हे दाखल केल्यावरच भाजप प्रवेशाची दारे उघडली जातात, याची पुरेशी कल्पना असूनही ठाकरे गटाचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटले हा त्यांचा निव्वळ अडाणीपणा ठरला.
विलास शिंदे, मामा राजवाडेंच्या बाबत ठाकरे गटाचा इजा, बिजा झाला आता प्रशमेश गीते प्रकरणात तिजा न होवो म्हणजे मिळवली. अपूर्व हिरेच्या बाबतही तेच झाले. त्यांचे बंधू व ठाकरे गटाचे आणखी एक उपनेते अद्वय हिरे यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाल्यास आश्चर्य वाटू नये. कारण अद्वय यांच्याकडेही जिल्हा बँक भ्रष्टाचार प्रकरणातील गुन्हे व काही महिने कारागृहात राहण्याचे सर्टिफिकेट आहे. साहजिकच त्यांनाही पावन करून घेतल्यास आश्चर्य वाटू नये. (येथे हिरेंचा मंत्री दादा भुसेंशी उभा दावा आहे आणि हे गुन्हे व संस्थेच्या चौकशा कोणाच्या मेहरबानीने होत आहेत हे हिरेंना लक्षात आल्यानेच त्यांनाही भाजपच्या धुलाई मशीनचे आकर्षण वाटल्यास नवल ते काय) व्यंकटेश मोरे, रम्मी राजपूत आदींना केव्हाच स्वच्छतेचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे शुद्धीकरण केले गेले आहे. स्थायी समितीचे माजी सभापती व एके काळी भाजपचे खजिनदार असलेले गणेश गीते यांनाही बरेच दिवस प्रतीक्षेत ठेवून एकदाचे पावन केले गेले. आमदार राहुल ढिकले यांच्याविरोधात विधानसभेत उभे राहिलेल्या गीतेंना त्यामानाने फार लवकरच परतीचे वेध लागले होते. परंतु ढिकलेंच्या विरोधामुळे त्यांना कळ सोसावी लागली. याशिवाय भूसंपादन घोटाळ्याचा विषयही सोबत होताच. अर्थात संकटमोचक पाठीशी असल्यावर घाबरतील ते गीते कसले ! अशारीतीने असंख्य पापभिरू समाजसेवकांची पक्षप्रवेशाची कहाणी सुफळ संपूर्ण झाली. शिवसेना शिंदे गटानेही अशा अनेक पापभिरूंना पावन करणे सुरूच ठेवल्याने काही दिवसांनी दोन्हीकडील पापभिरूंची ‘मेरी कमीज तुझसे सफेद साठीची स्पर्धा सुरू झाल्यास नवल ते काय..




