शैलेंद्र तनपुरे | Nashik
सध्या ग्रामपंचायतीवगळता स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर कोणत्याही निवडणुकीचे (Election) पडघम नसताना राजकारणात आयाराम-गयाराम सुरू झाल्याने अनेकांच्या भुवया वक्री होणे ओघानेच आले. सर्वसाधारणपणे निवडणुकांच्या णुकाच्या काळात राजकीय पुढारी वा कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षांना अचानक धुमारे फुटायला लागतात. अनेकांना एकाएकी आपल्यावर अन्याय झाल्याचा साक्षात्कार होतो, तर काहींना दुसऱ्या पक्षात संधी खुणावत असते. काहीजण दुसऱ्याला काहीतरी मिळाले म्हणून नाराज होऊन काही पर्याय शोधतो. असे काही ना काही जे सुरू असते, ते खरे तर व्यक्तिगत स्वार्थाचाच एक भाग असतो. परंतु त्यावर अन्यायाचा मुलामा चढवला जातो. कोणतीही निवडणूक नसताना गेल्या आठवड्यात नाशिकमधील दोन पक्षांतराची त्यामुळेच चर्चा होत आहे.
काँग्रेसचे नेते प्रसाद हिरे (Prasad Hiray) यांनी भारतीय जनता पक्षात सपत्नीक प्रवेश केला तर डॉ. हेमलता पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला. प्रसाद हिरे यांचा भाजपमधील हा दुसरा प्रवेश. यापूर्वी त्यांनी दाभाडी मतदारसंघातून भाजपची उमेदवारीही केलेली आहे. तेव्हा युतीमुळे दादा भुसे अपक्ष उभे राहिले आणि विधानसभेत पोहोचले. भुसेंची ही एन्ट्री आजतागायत टिकून असल्याचे काही प्रमाणातील श्रेय तेव्हाच्या हिरेंच्या या भाजपमधील उमेदवरीला दिल्यास वावगे ठरू नये. पुढे प्रसाद हिरे पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. हिरे घराण्याची धाकली पाती अद्वय यांच्याशी त्यांनी जमवून घेतले. बाजार समितीत सत्ताही मिळाली. पण मतदारसंघात इतर सगळीकडेच आता दादा भुसेंना आव्हानच राहिलेले नसताना हिरेंना भाजपशिवाय तसाही पर्याय नव्हता. कारण त्यांचे पूर्वसुरी डॉ. तुषार शेवाळे यांनीही गेल्या निवडणुकीत काँग्रेसची (Congress) शस्रे म्यान करून भाजपचे कमळ हाती घेतले होतेच.
शेवाळे तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यातुलनेत प्रसाद बापूंकडे असे मोठे पद नव्हते, तरीही त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होते याचे कारण त्यांना असलेला कौटुंबिक वारसा. प्रसाद हिरेंचे वडील डॉ. बळीराम हिरे यांनी एकेकाळी राज्याच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका निभावलेली आहे. अनेक वर्षे मंत्रिपद भूषवलेले डॉ. हिरे थेट मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आले होते. त्या चर्चेनेच नंतर त्यांचा घात केला हा भाग अलाहिदा. परंतु अशा मातब्बर नेत्याचा वारसा लाभलेल्या प्रसाद बापूंना मात्र राजकारण काही फारसे मानवले नाही. त्यांनी बरेच हातपाय मारून पाहिले, मात्र तोपर्यंत तालुक्यातील राजकारणाचा बाज पूर्णतः बदलला होता. दादा भुसेंच्या रूपाने आक्रमक हिंदुत्ववादाचे वादळ आले होते. त्यात सगळ्याच हिऱ्यांचा पालापाचोळा झाला. गेली पाच टर्म भुसेंची तालुक्यावर अनभिषिक्त सत्ता आहे. आता तर त्यांच्या पुढच्या पिढ्याही रांगेत आल्या आहेत. अशावेळेस इतर पक्षांना फारशी स्पेस राहिलेली नाही.
साहजिकच शतप्रतिशतचा नारा पूर्ण करायचा असेल तर आपले अस्तित्व ठेवावे लागेल या उद्देशाने भाजपलाही अशा राजकीय घराण्यातील व्यक्तीची गरज होतीच. भाजपमध्ये हिरेंना कितपत भवितव्य राहील याबाबत राजकीय अभ्यासकांमध्ये संभ्रम आहे. तो स्वाभाविकही आहे. परंतु यंदा प्रसाद बापूंनी भाजपमध्ये जाताना गीतांजली या धर्मपत्नीचाही जाहीर प्रवेश करवला आहे. याला खूप मोठा अर्थ आहे. गीतांजली हिरे या कर्मवीर रावसाहेब थोरात यांची व लोकनेते माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांची नात. वडील मुरारराव थोरात हे रावसाहेबांचे दत्तक पुत्र तर आई मंगला या बाळासाहेब देसाईंच्या कन्या. याशिवाय विद्यमान पर्यटनमंत्री शंभुराज देसाई हे मामेभाऊ. चाळीसगावच्या माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख या मामेबहीण. त्यांचे पती राजीव देशमुख हेदेखील आमदार राहिलेले आहेत.
माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भगिनी या काकू. महाराष्ट्राच्या या बड्या राजघराण्यातील आणखी अनेक नातीही सांगता येतील. विस्तार भयास्तव देत नाही. मात्र, गीतांजली हिरे यांच्या राजकारणातील पदार्पणाला असलेली ही राजकीय पार्श्वभूमी किती महत्त्वाची आहे, हे समजावे यासाठी उल्लेखिलेल्या नातेसंबंधांची उजळणी केली. या संबंधात मोहिते-पाटलांचाही उल्लेख झाला. त्यांच्याच नात्यातील डॉ. हेमलता पाटील (Dr.Hemlata Patil) यांनीही नेमका याचवेळी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, हा आणखी एक वेगळा राजकीय योगायोग. हेमलता पाटील या काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्या. नगरसेविका म्हणून उत्तम काम केलेले. काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे.
विधानसभेत काँग्रेसला जागा सुटली नाही. त्यामुळे त्या नाराज होत्या. अलीकडेच त्यांनी काँग्रेसचा त्याग करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र दोन महिन्यातच त्यांची पक्षांतराची हौस फिटलेली दिसते. तेथील वातावरण पाहून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. एवढ्या लवकर त्यांचा भ्रमनिरास झाल्याने त्या नेमक्या कशासाठी तिकडे गेल्या होत्या, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यापुढे स्वतंत्रपणे सामाजिक काम करण्याचे त्यांनी ठरवले असले तरी त्यांचा स्वभाव, कार्यपद्धती पाहता आज ना उद्या त्यांना काँग्रेस हीच जवळची वाटू शकेल. सध्या कोणत्याही निवडणुका नसल्याने काँग्रेस सोडताना केलेली अनाठायी घाई यावेळी त्या करणार नाहीत, अशी अपेक्षा. मात्र, त्यांच्या अशा आकस्मिक पक्षत्यागाने शिवसेनेत मात्र बरेच फटाके फुटण्याची शक्यता आहे. त्याबद्दल पुढच्या लेखात..