Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : शिंदेंच्या शिवसेनेत घमासान; एबी फॉर्म न मिळाल्याने कार्यकर्त्याचा आत्महत्येचा...

Nashik Politics : शिंदेंच्या शिवसेनेत घमासान; एबी फॉर्म न मिळाल्याने कार्यकर्त्याचा आत्महत्येचा इशारा

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

महानगरपालिका निवडणुकीच्या (NMC Election) पार्श्वभूमीवर प्रभाग ३१ हा सध्या राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता हाणामारी, पक्षांतर्गत नाराजी आणि थेट आत्महत्येच्या इशार्‍यापर्यंत पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रभाग ३१ मध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याच्या आरोपांमुळे आधीच असंतोषाचे वातावरण असताना, शिवसेना गटाच्या उमेदवारी प्रक्रियेत ऐनवेळी झालेल्या उलटापालटीमुळे परिस्थिती अधिकच चिघळली.

- Advertisement -

एबी फॉर्म (AB Form) देण्याच्या शेवटच्या दिवशी अ) गटातून अनिल गायकवाड आणि ब) गटातून पूजा शिवा तेलंग यांना एबी फॉर्म न मिळाल्याने उमेदवार व समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यांच्या जागी युतीकडून अविनाश शिंदे तर उबाठात असलेल्या रवींद्र गामने यांना अचानक एबी फॉर्म देण्यात आल्याने पक्षांतर्गत उमेदवार व समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली. या निर्णयाविरोधात समर्थकांनी ठिकठिकाणी बैठका व सभा घेत अनिल गायकवाड व पूजा तेलंग यांना जाहीर पाठिंबा दिला.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Politics : नाशकात मनसेला धक्का; माजी नगरसेविकेचा भाजपमध्ये प्रवेश

उमेदवारी माघारीच्या दिवशी पक्षाकडून माजी नगरसेवक सुदाम ढेमसे व संगीता ढेमसे यांना फोनवरून तसेच प्रत्यक्ष तोंडी सूचना देऊन अनिल गायकवाड व पूजा तेलंग यांना पक्षाकडून पुरस्कृत करण्याचे पत्र देण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सुदाम ढेमसे व संगीता जाधव यांनी दोन्ही उमेदवारांना पत्र दिले; मात्र एबी फॉर्मधारक अविनाश शिंदे व रवींद्र गामने यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला. दरम्यान, पूजा तेलंग व त्यांचे पती शिवा तेलंग यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत परिसरातील नागरिकांनी (Citizen) त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता. मात्र ऐनवेळी इतर उमेदवारांना एबी फॉर्म कसे व कोणाच्या आदेशाने देण्यात आले, याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले.

या पार्श्वभूमीवर पूजा तेलंग यांचे पती शिवा तेलंग यांनी पक्षातील माजी नगरसेवक, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर आरोप करत आत्महत्येचा इशारा सोशल मीडियावरून दिल्याने राजकीय वातावरण पूर्णतः स्फोटक बनले. त्यानंतर शिवा तेलंग यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पक्षाने या प्रकरणाची तातडीने अंतर्गत चौकशी सुरू केली असून वरिष्ठ स्तरावर हालचालींना वेग आला आहे.

हे देखील वाचा : Girish Mahajan : “कोण खरे आहे ते…”; उमेदवारीवरून गोंधळ घालणाऱ्यांना मंत्री महाजनांनी दिला इशारा

दरम्यान, या संदर्भात शिवा तेलंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. प्रभाग ३१ मधील उमेदवारीचा हा वाद आता केवळ राजकीय न राहता मानवी व सामाजिक पातळीवर गंभीर प्रश्न निर्माण करत असून, येत्या काळात याचे पडसाद संपूर्ण महापालिका निवडणुकीवर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेचे शहरप्रमुख व इतरांना संपर्क साधला असता, संपर्क होवू शकला नाही.

ताज्या बातम्या