Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : शिवसेनेतील बड्या नेत्याला लवकरच नारळ? गटबाजीची गंभीर दखल

Nashik Politics : शिवसेनेतील बड्या नेत्याला लवकरच नारळ? गटबाजीची गंभीर दखल

फेररचना होणार

नाशिक | विशेष प्रतिनिधी | Nashik

डॉ. हेमलता पाटील (Dr.Hemlata Patil) यांच्या पक्षत्यागानंतर शिवसेना शिंदे गटात (Shivsena Shinde Group) लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचे बोलले जात असून संघटनात्मक फेरबदल करताना एका बड्या नेत्याला नारळ दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या (Congress) नेत्या, माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र नुकताच त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला असून आपण पक्षाला न्याय देऊ शकू असे वाटत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे समाज माध्यमाद्वारे जाहीर केले होते. प्रत्यक्षात पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला असून सध्या नाशिकमधील संघटनेत जे काही चालू आहे, त्याची कारणे शोधून लागलीच सुधारणा करण्याचे आदेश दिल्याचेही सांगितले जाते. पक्षात गेल्या काही महिन्यांपासून श्रेयवादाची तुंबळ स्पर्धा सुरू असून इतर पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका गटाने काही नेत्यांना गळाला लावले की लागलीच दुसरा गट इतर काहींना खेचून पक्षात आणून हम भी कम नहीं, असा पवित्रा घेत आहे. या खेचाखेचीतच अनेकांचा प्रवेश झाला खरा, पण या नव्यांनी पक्षात नेमके करायचे काय याचे काहीही नियोजन नसल्याने एकप्रकारची अनागोंदी निर्माण झाली आहे. नेत्यांपुढे आपले महत्व वाढविण्याचा आटापिटा सुरु असल्याने त्याचाही त्रास नव्याने येणाऱ्यांना बसत असल्याचे सांगितले जाते.

मध्यंतरी खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी नाशिकमधील (Nashik) सर्वच नेत्यांना बोलावले असता तेथेही दोन गटात बरीच शाब्दिक वादावादी झाल्याचे सांगितले जाते. निवडणूक काळातील अनुभवाचेही मंथन यावेळी झाले. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी काही नेत्यांच्या संदिग्ध भूमिकेवरही कडाडून हल्ला चढविला. मुंबईतून येणारे नेते येथील गटबाजीला खतपाणी घालत असल्याच्या निष्कर्षाप्रत वरिष्ठ नेते आले असून यातून मार्ग काढण्यासाठी संघटनात्मक फेरबदल करण्याचाही विचार सुरु आहे. पक्षातील गटबाजीमुळे काही नेत्यांचे प्रवेशही रखडले असल्याचे बोलले जाते. एकीकडे पक्षात येण्यासाठी इच्छुकांची रांग लागलेली असतांना हेमलता पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे बहिर्गमन धोकादायक असून याची योग्यवेळी दखल न घेतल्यास गळतीला सुरुवात होऊ शकते, अशी साधार भीतीही काहींनी व्यक्त केल्याने पदांचे पत्ते पिसले जाणार असल्याचे खात्रीलायकरीत्या कळते.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Politics : पडसाद! हिरे, पाटलांच्या पक्षांतराचा अन्वयार्थ

0
शैलेंद्र तनपुरे | Nashik सध्या ग्रामपंचायतीवगळता स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर कोणत्याही निवडणुकीचे (Election) पडघम नसताना राजकारणात आयाराम-गयाराम सुरू झाल्याने अनेकांच्या भुवया वक्री होणे ओघानेच आले....