नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंधुदुर्ग हत्या (Murder) ही बीड पेक्षा गंभीर घटना आहे. निलंबित पोलीस अधिकार्याने सांगितलेल्या फेक एन्काऊंटर (Fake Encounter) बाबतच्या विधानाची चौकशी झाली पाहिजे. पोलीस डायरीत त्याची नोंद त्यांनी केलेली आहे, असे ते सांगत आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे. या अधिकाऱ्याच्या वाक्यामुळे फेक एन्काऊंटर झाल्याला चर्चेला पुष्टी मिळाली आहे. वाल्मिक कराड यांचे काम संपल्यानंतर त्याला मारण्याचा प्लॅन होता का? हे तपासणे गरजेचे असल्याची मागणी खा.संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाशिबीर नाशिकमधे उद्या होत आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत नाशिकला तळ ठोकून आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी काही गंभीर विषयांवर सरकारवर खरपूस टीका केली.
यावेळी राऊत म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातला (Sindhudurg District) जो दहशतवाद आहे, खुनाखुनी आहे, त्याच्याशी वैभव नाईक सातत्याने आणि संघर्षाने लढा देत आहेत. वैभव नाईक त्या ठिकाणी १० वर्ष आमदार होते. आतापर्यंत जिल्ह्यात २७ खून झाले आहेत. त्यातले ९ खून हे शिवसैनिकांचे आहेत. अत्यंत निर्घृणपणे त्यांना मारण्यात आले आहे. आजही त्याठिकाणी असे हत्याकांड सुरूच आहेत. त्यांचा ‘आका’ कोण आहे? त्याबद्दल वैभव नाईक यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देणे गरजेचे असल्याचे खा.राऊत यांनी यावेळी सांगितले. बीड घटनेपेक्षा भयंकर घटना सिंधुदुर्गमध्ये घडत आहेत, यासाठी आम्ही कोकणात जाणार”, असल्याचे खा.राऊत म्हणाले.
तर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना खा. राऊत म्हणाले की, “आम्हाला त्यांच्यासोबत अजिबात सत्तेत जायचे नाही. प्रत्यक्षात ईव्हीएमच्या माध्यमातून ते जिंकून आले आहेत. भाजपाला कोणी मतदान केले नाही.चंद्रकांत पाटील यांना तरी अजिबात कोणी मतदान केले नाही. मोदींची (Modi) बहिण तुलसीने ईव्हीएमबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे, मुबंई महापालिकेसाठी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. मात्र त्यांच्याकडे फक्त ईव्हीएम (EVM) आणि पैसे असल्याची टीका एका प्रश्नाच्या उत्तरात खा.राऊत यांनी केली.
निधी मिळत नसल्याची तक्रार?
लाडक्या बहीणींना ५०० रुपये देण्यात येणार आहेत. याबाबत लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले पाहिजे. प्रत्यक्षात राज्यात आर्थिक संकट आहे फडणवीस कितीही बोलले तरी आर्थिक संकटात हे राज्य सापडले आहे. अजित पवार बोलत नसले तरी या आर्थिक चिंतेने ते देखील ग्रासले आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केली की, आम्हाला निधी मिळत नाही. प्रत्यक्षात निधी मिळत नाही म्हणजे कुणाला मिळत नाही? जे काही गद्दार आमदारांना फक्त राज्य लुटायचे आहे. या प्रश्नावर अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना जे उत्तर दिले ते फार इंटरेस्टिंग आहे, तुम्ही त्याचा शोध घ्या, अशी सूचनाही खा. संजय राऊत यांनी पत्रकारांना केली.
नाशिकला शिबिर
नाशिकमध्ये शिवसेनेचे शिबिर होणार आहे त्याची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी शहरात वातावरण निर्मितीसाठी एक बाईक रॅली काढण्यात येणार आहे. मशाल हातात घेऊन ही रॅली निघणार आहे. महाशिबिरासाठी आदित्य ठाकरे आज नाशिकला (Nashik) दाखल होणार आहेत. तर उद्धव ठाकरे बुधवारी येणार आहेत. बाळासाहेब ठाकरे आज असते, तर आजच्या परिस्थितीवर ते काय बोलले असते याबद्दल उत्सुकता आहे. त्याअनुषंगाने ‘एआय’ सारख्या तंत्रज्ञानातून त्यांच्या भाषणाचे अंश तयार करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये याबाबत प्रयोग झाला असून, उद्या मुंबई बाहेर म्हणजेच नाशिकमध्ये या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.